बँकेच्या ‘कॅश व्हॅन’चा वापर चोरीसाठी !
By admin | Published: June 11, 2016 04:25 AM2016-06-11T04:25:41+5:302016-06-11T04:25:41+5:30
बँकेचे कोट्यवधी रुपये घेऊन जाणारे ‘कॅश व्हॅन’चे कर्मचारी या व्हॅनचा वापर वाहन चोरीसाठी करीत असल्याचे भांडुपमध्ये समोर आले
मनीषा म्हात्रे,
मुंबई- बँकेचे कोट्यवधी रुपये घेऊन जाणारे ‘कॅश व्हॅन’चे कर्मचारी या व्हॅनचा वापर वाहन चोरीसाठी करीत असल्याचे भांडुपमध्ये समोर आले. त्यांचा हा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे व्हॅनमधून ने - आण करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भांडुप परिसरात गेल्या काही दिवसांपासून बाईक, सायकल चोरीचे प्रकार वाढले होते. डकलाइन रोड येथील प्रकाश नवले यांच्या घराबाहेरील दोन सायकल बुधवारी रात्री गायब झाल्या. परिसरात शोधाशोध घेऊनही सायकली मिळाल्या नाहीत. अखेर येथील रेकॉर्डिंग स्टुडिओबाहेर असलेल्या सीसीटीव्हीकडे नवलेंचे लक्ष गेले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर वाहनचोरीचा संशय येऊ नये म्हणून कॅश व्हॅनचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. या फुटेजमध्ये रात्री दीडच्या सुमारास लुटारू कॅश व्हॅनमधून या परिसराची रेकी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच दरम्यान बाजूने येत असलेली पोलिसांची गाडी पाहून ते लपले. त्यानंतर पोलीस जाताच तेथील सायकल कॅश व्हॅनमध्ये भरून लुटारूंनी पळ काढला. त्यांचा प्रताप येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
स्थानिकांनी थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच या लुटारूंनी चोरीला गेलेली सायकल पुन्हा नवले यांच्या घरासमोर नेऊन ठेवली. त्यानंतर लुटारूंनी कुटुंबीयांना तक्रार मागे घ्यावी म्हणून धमकावल्याची माहिती नवलेंनी ‘लोकमत’ला दिली. त्यात लूट करणारे हे कॅश व्हॅनचालक असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजवरून भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अनेकदा या वाहनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच दरोड्याचे प्रकार समोर आले आहेत. (प्रतिनिधी)
यापूर्वीच्या घटना...
१६ जानेवारी २०१५ - विलेपार्ले येथील बँकेच्या कॅश व्हॅनवर दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात कोट्यवधींची रोकड दरोडेखोरांनी लुटली होती. विलेपार्लेहून उपनगर भागात तब्बल दोन कोटी रुपये घेऊन जात असताना गाडीवर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये गाडीवरील कर्मचाऱ्याचा हात होता.
९ एप्रिल २०१५ - माटुंग्यात १ कोटी ४४ लाख रुपयांची रोकड घेऊन कॅश व्हॅनचालक पसार झाला होता. त्यानंतर यातील काही रक्कम काढून अटकेच्या भीतीने व्हॅन माटुंगा, सात रस्ता येथे सोडून त्याने पळ काढला.