बँकांनी बंद केली सोन्याची आयात
By admin | Published: November 15, 2016 05:56 AM2016-11-15T05:56:17+5:302016-11-15T05:56:17+5:30
मागील पाच दिवसांपासून मुंबई किंवा इतर ठिकाणच्या होलसेलर्सकडून तुकडा किंवा सोन्याचा कुठलाही पुरवठा झालेला नाही. सध्या व्यवहार
जळगाव : मागील पाच दिवसांपासून मुंबई किंवा इतर ठिकाणच्या होलसेलर्सकडून तुकडा किंवा सोन्याचा कुठलाही पुरवठा झालेला नाही. सध्या व्यवहार ठप्प असल्याने बँकाच होलसेलर्सना धनादेश किंवा रोकड घेऊन सोने देत नसल्याची माहिती बाजारातून मिळाली आहे.
शहरातील सराफ बाजारामध्ये सोमवारी रोकड देऊन सोने खरेदीचे व्यवहार नेहमीच्या तुलनेत एक टक्काही झाले नाहीत. परंतु लग्नसराई व इतर कारणे यामुळे ग्राहक डेबिट कार्डचा वापर करीत आहेत. सोमवारी सोन्याचा भाव ४०० रुपयांनी वधारून ३१,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला. सकाळी ३० हजार ७०० रुपयांवर सोने विक्रीचे व्यवहार सुरू झाले होते. दुपारी दरवाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६२ पैशांनी कमकुवत झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडींचा परिणामही सुवर्ण बाजारावर होत आहे. (प्रतिनिधी)
रुपया कमकुवत होईल-
सुवर्णबाजारामध्ये पुढे काय स्थिती राहील हे सांगता येत नाही, पण रुपया आणखी कमकुवत होईल. मोठ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेला छोट्या नोटांचा तुटवडा, बँकांसमोरील रांगा, ग्राहकांची खालावलेली क्रयशक्ती, बाजारपेठा ठप्प होणे याला सरकार जबाबदार आहे.
- ईश्वरलाल जैन,
माजी खासदार तथा संचालक आर. एल. ज्वेलर्स, जळगाव
ग्राहकांचा कल जुने सोने देऊन नवीन सोने बनवून घेण्याकडे आहे. लग्नसराईमुळे जुने सोने देऊन नवे घेण्याचा मुद्दा समोर आला आहे. डेबिट कार्डचे व्यवहारही काहीसे वाढले आहेत.
- पप्पू बाफना, सोने व्यावसायिक