बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे
By Admin | Published: July 21, 2016 03:03 AM2016-07-21T03:03:06+5:302016-07-21T03:03:06+5:30
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचे वेळेत वाटप करून बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे.
अलिबाग : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचे वेळेत वाटप करून बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच ज्या बँका त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकांची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि संबंधित बँकांच्या वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येईल, अशी तंबी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी जिल्ह्यातील बँक प्रमुखांना दिली आहे, तर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांना दिलेले उद्दिष्ट त्यांनी वेळेत पूर्ण केल्याबद्दल बँकेचा विशेष गौरव केला आहे.
किसान दिनानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रायगड जिल्ह्यातील बँकांच्या वतीने शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक कर्जाच्या धनादेशाचे वाटप जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी तेली-उगले पुढे म्हणाल्या, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेला आवश्यक असलेला निधी मंजूर केलेला आहे. हा निधी संबंधित बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर वितरीत करावा. यंदाच्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी वाटप करायच्या कर्ज उद्दिष्टापैकी ८० टक्के म्हणजे १२५ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप पूर्ण केले असल्याची माहिती रायगड जिल्ह्याची शासन नियुक्त अग्रणी बँक असलेल्या बँक आॅफ इंडियाचे अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक टी. मधुसूदन यांनी सांगितले.
यावेळी बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीष कुमार सिंग, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक टी. मधुसूदन, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुधाकर रागतवन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खेडका आदिंसह जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी व निमंत्रित शेतकरी उपस्थित होते. बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे