सुट्टीनंतर बँका आज उघडणार, 4 वेगवेगळ्या लागणार रांगा

By admin | Published: November 15, 2016 08:59 AM2016-11-15T08:59:51+5:302016-11-15T09:38:17+5:30

सोमवारच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील बँका आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उघडणार आहे.

Banks will open today after the holiday, 4 different ranges | सुट्टीनंतर बँका आज उघडणार, 4 वेगवेगळ्या लागणार रांगा

सुट्टीनंतर बँका आज उघडणार, 4 वेगवेगळ्या लागणार रांगा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 - सोमवारच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील बँका आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उघडणार आहे. गुरू नानक यांच्या जयंतीमुळे सोमवारी देशभरातील बँक कर्मचा-यांना सुट्टी होती. बँका बंद असल्यामुळे एटीएमबाहेर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सुट्टीचा संपूर्ण दिवस एटीएमबाहेर रांगा लावण्यात गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नोटबंदीच्या निर्णयामुळे गेल्या चार दिवसांपासून बँका तसेच एटीएमबाहेर नोट बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 
 
एक दिवसाच्या सुट्टीनंतर बँका उघडणार असल्याने मुंबईसह देशभरात नागरिकांनी पहाटेपासूनच बँका तसेच एटीएमबाहरे रांगा लावल्या आहेत. काही तर चक्क रात्रीपासूनच एटीएम, बँकाबाहेर बसून आहेत. दरम्यान, नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता बँक कर्मचा-यांनी चार वेगवेगळ्या रांगा करण्याचा निर्णय घेतला आहे. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अशा चार रांगा बँकाबाहेर लावण्यात येणार आहेत. 
 
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून तात्पुरता काही होईना, पण नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर चार्ज लागणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 
बँक, एटीएममधील निर्बंध शिथील 
दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून 4000 रुपये काढण्याचे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला 4,000 रुपयांऐवजी 4,500 रुपये काढता येऊ शकतात.  तसेच एटीएममधूनदेखील 2,000 रुपयांऐवजी 2,500 रुपयांची रक्कम काढता येणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 
 
 
एसटी महामंडळाचा शेतक-यांना दिलासा
नोटांच्या कमतरतेमुळे एसटी महामंडळाने शेतक-यांना विनाशुल्क भाजीपाला एसटीमधून नेण्यास मंजुरी दिली आहे. 50 किलोपर्यंत भाजीपाला शेतक-यांनी एसटीतून विनाशुल्क नेता येणार आहे.  
 
(भाजीपाल्याची एसटीतून विनाशुल्क वाहतूक)
 
सर्व विमानतळावरील पार्किंग मोफत
तसेच,देशभरातील सर्व विमानतळांवर 21 नोव्हेंबरपर्यंत पार्किंग मोफत करण्यात आली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात का होईन पण सर्वसामान्यांना दिलासा मिळला आहे. 
 
 

Web Title: Banks will open today after the holiday, 4 different ranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.