बामणोलीत बेकायदा २२० गर्भपात!
By Admin | Published: October 17, 2014 10:47 PM2014-10-17T22:47:14+5:302014-10-17T22:54:00+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा छापा : डॉक्टर ताब्यात; शस्त्रकिया विभाग सील
सांगली/कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील ‘शतायू’ या खासगी रुग्णालयावर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या पथकाने आज, शुक्रवारी दुपारी छापा टाकला. रुग्णालयात बेकायदा गर्भपात केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर, गेल्या सात वर्षांत सुमारे २२० गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. लाडे यांना ताब्यात घेऊन रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग सील करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
लाडे यांनी २००७ मध्ये कुपवाडजवळ बामणोलीत रुग्णालय सुरू केले आहे. त्यांच्याकडे बीएएमएस व एमडी (आयुर्वेद) पदवी आहे. पंचकर्म चिकित्सा आणि जनरल फिजिशियन म्हणून ते उपचार करतात. त्यांच्या पत्नी डॉ. उत्कर्षा याही आहारतज्ज्ञ म्हणून याच रुग्णालयात कार्यरत आहेत. ते नर्सिंग महाविद्यालय व विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान या दोन संस्थाही चालवितात. रुग्णालयाच्या फलकावर स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा प्रसूती केंद्र असा कोणताही उल्लेख नाही. ते गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरील डॉक्टरांना बोलावून महिलांचा गर्भपात करीत असल्याची माहिती कुशवाह यांना मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी बोगस ग्राहक पाठवून याची खात्रीही करण्यात आली. त्यानंतर आज अचानक छापा टाकण्यात आला.
या छाप्यात रुग्णालयातील रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यावेळी २००७ पासून आतापर्यंत २२० महिलांचे बेकायदा गर्भपात केल्याचे उघडकीस आले. (प्रतिनिधी)