डोळ्यांवर पट्टी बांधून साकारले बाप्पा
By admin | Published: August 29, 2014 03:33 AM2014-08-29T03:33:54+5:302014-08-29T11:01:24+5:30
‘रूप पाहता लोचनी’ असे म्हणत लाडक्या बाप्पाची सेवा करण्यासाठी सर्वच जण आतुर झाले आहेत.
मुंबई : ‘रूप पाहता लोचनी’ असे म्हणत लाडक्या बाप्पाची सेवा करण्यासाठी सर्वच जण आतुर झाले आहेत. लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येक जण लाडक्या बाप्पाची रुपे, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नावांच्या प्रेमात पडतात. याच धर्तीवर डोळ्यांवर पट्टी बांधून रमा शहा यांनी १४ वर्षांत बाप्पाच्या ३ लाख मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे.
मुंबई येथील सायन विभागात राहणाऱ्या रमा शहा यांनी गणपती बाप्पाच्या प्रेमापोटी गणपतीची विविध रुपे साकारण्याचा ध्यास घेतला आहे. मंत्रोच्चार करीत कोणत्याही साच्याचा वापर न करता आणि डोळ्यांवर पट्टी बांधून शहा यांनी मूर्ती साकारण्याची कला अवगत केली आहे.
गणेशभक्त रमा शहा यांच्या नावावर २७ वेगवेगळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आणि विक्रम आहेत. शहा यांचे कलागुण मोठे बाप्पा बनविण्यापासून ते एका इंचाचे बाप्पा घडविण्यापर्यंत दिसून येतात. वयाच्या १९व्या वर्षापासून त्यांनी गणेशमूर्ती घडविण्याचा छंद जोपासला आहे. गणेशोत्सव काळातील उंच मूर्तीच्या स्पर्धेत आपल्या कलेतून ‘उत्सवा’चे पावित्र्य राखण्याचा संदेश देण्याची इच्छा शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या काही मिनिटांच्या आत शहा या गणेशाची सुबक मूर्ती घडवितात. ही मूर्ती घडविण्याची प्रक्रिया पाहताना गणेशाच्या वरदहस्ताची जाणीव होते. तसेच, भक्ताचे आणि बाप्पाचे निरागस नाते मूर्ती घडविताना अधिकच घट्ट होते, असे शहा यांनी सांगितले.