बाप्पा, राज्याचा विकास होऊ द्या!
By admin | Published: November 5, 2014 12:58 AM2014-11-05T00:58:57+5:302014-11-05T00:58:57+5:30
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान, प्रचंड दगदग अन् दररोज नवीन अडचणींचा सामना. या सर्वांसाठी दृढ आत्मविश्वास अन् मन:शांती मिळते ती देवदर्शनातून. मुख्यमंत्री झाल्यानंतर
मुख्यमंत्री फडणवीसांचे टेकडी गणेशाला साकडे
नागपूर : मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान, प्रचंड दगदग अन् दररोज नवीन अडचणींचा सामना. या सर्वांसाठी दृढ आत्मविश्वास अन् मन:शांती मिळते ती देवदर्शनातून. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच नागपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी टेकडी मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. राज्यकारभार सुरळीतपणे चालू द्या व राज्याचा विकास होऊ द्या, असे साकडेच यावेळी त्यांनी बाप्पाला घातले.
सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री टेकडी गणेश मंदिरात आले. यावेळी परिसरात सुरक्षा व्यवस्था असली तरी अनेक भक्तांना मुख्यमंत्री येथे येणार आहेत, याची कल्पनाच नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या पाहिल्यानंतर कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आली आहे, याची जाणीव उपस्थित नागरिकांना झाली. फडणवीस यांनी माल्यार्पण करून गणेशपूजन केले व नैवेद्य अर्पण केला. दर्शन झाल्यानंतर गणेश मंदिर ट्रस्टतर्फे त्यांचा गणेशाची फ्रेम, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी टेकडी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लखीचंद ढोबळे, सचिव के.सी. गांधी, विश्वस्त प्रमोद देवरणकर, श्रीराम कुळकर्णी, सचिव पुंडलिक जवंजाळ, पुजारी पारखी हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री परत जायला निघाले असताना उत्साही नागरिकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. मुख्यमंत्र्यांनी हसतमुखाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. (प्रतिनिधी)