बाप्पा मोरया रे

By admin | Published: September 13, 2015 05:05 AM2015-09-13T05:05:00+5:302015-09-13T05:05:00+5:30

गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते.

Bappa Moriah Ray | बाप्पा मोरया रे

बाप्पा मोरया रे

Next

- रमेश सहस्रबुद्धे

गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते. गणेशोत्सवातील प्रथा-परंपरांच्या बदलत गेलेल्या प्रवासाकडे टाकलेला दृष्टिक्षेप...

भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभकार्याप्रसंगी प्रथम गणपतीचे पूजन करतात, असे का? याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. ‘गण’ म्हणजे अष्टवसूंचा समूह. ‘वसू’ म्हणे दिशा. गणपती म्हणजे अष्टदिशांचा स्वामी. इतर देवता गणेशाच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणूनच कोणत्याही देवतेची पूजा अथवा मंगलकार्य करताना प्रथम गणेशपूजन करतात. गणपतीने एकदा का दिशा मोकळ्या केल्या, की ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तेथे येऊ शकते. यालाच महागणपती पूजन असे म्हणतात. जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या विस्फुटित लहरींचा समूह म्हणजे गण आणि त्याचे निमंत्रण करणारा तो गणपती. विनाशकारक व तमप्रधान अशा तीनशे साठ यमलहरी विविध दिशांतून अव्याहतपणे प्रवास करत असतात; परंतु गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशीपर्यंत गणेश लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी होते. यासाठीच गणपतीची या काळात आराधना केली जाते.
इसवी सन १९३०-४०च्या दरम्यान पुण्यात सार्वजनिक गणपतीपुढे पुढाऱ्यांची व्याख्याने होत. पट्टीचे वक्ते व्याख्यानासाठी गायकवाडवाड्यात हजेरी लावून जात. वक्त्यांच्या अनुचित विधानानंतर वादळेही माजत. व्याख्यानांव्यतिरिक्त या काळी नामवंत गायकांच्या गायनाचे कार्यक्रम आणि काव्यगायनेही गणपतीसमोर होत; तरीही गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असे ते मेळ्यांचे. अशा मेळ्यांची एकूण संख्या त्या काळी पन्नास-साठ असावी.
प्रामुख्याने सारस्वत व ब्राह्मणांची वस्ती असलेल्या मुंबईतील शांताराम चाळीच्या गणेशोत्सवास १८९४मध्ये प्रारंभ झाल्याचे जुन्या कागदपत्रांवरून आढळते. हा गणेशोत्सव १८९७पर्यंत साजरा झाला. त्यानंतर १८९८ ते १९००पर्यंत उत्सव बंद पडला. प्रथम दुष्काळ, त्यानंतर प्लेग, मग ब्रिटिशांची दडपशाही, टिळकांना झालेली कारावासाची शिक्षा, यामुळे तेथील गणेशोत्सव बंद पडला असावा. शांताराम चाळीचा गणेशोत्सव बंद पडणे, लोकमान्य टिळकांना रुचले नाही. अखेर चाळीतील रहिवाशांची सभा होऊन हा उत्सव पुन्हा सुरू करण्याचे ठरले. कै. विष्णुपंत राशिनकर यांनी उत्सवास पहिली वर्गणी दिली. मग १६ सप्टेंबर १९०१ रोजी लोकमान्य टिळकांनी स्वहस्ते शांतारामच्या चाळीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवास धीराने उभे केले.
सन १९०१पासून आजतागायत हा गणेशोत्सव सुरू आहे. या चाळीतील गणेशोत्सवाचा शतक महोत्सवी सोहळा १ ते १२ सप्टेंबर २००० या काळात साजरा झाला होता.

कायमस्वरूपी मूर्ती बनविण्याचा काळ...
कायमस्वरूपी गणेशमूर्ती फक्त गणेशोत्सवाच्या काळात ठेवण्यात येऊ लागल्या. पूजेसाठी मात्र, छोट्या मूर्ती असून, त्या बोलविल्या जात. मात्र, या मोठ्या कायमस्वरूपी मूर्ती बोलविल्या जात नसत. पुण्यातील खडकावरील खेडकरांचा लाकडी गणपती, हत्ती गणपती, ही त्याची उदाहरणे होत. आजही अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मोेठ्या मूर्ती या कायमस्वरूपी असतात.

गणेशाची विडंबनरूपे...
दुसऱ्या महायुद्धापासून गणेशमूर्तीची विडंबनरूपे करण्यात येऊ लागली. गणपतीच्या मूर्तींना ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांची रूपे देण्यात आली. त्यानंतर सामाजिक चित्रपटांच्या दृश्यातही गणेशमूर्ती आकार घेऊ लागल्या.
‘आवारा’ चित्रपटातील राज कपूर, नर्गिसच्या प्रणयदृश्यातील गणेशमूर्ती, राजकमलच्या ‘रामजोशी’तील सवाल-जबाबच्या दृश्यातील गणेशमूर्ती, तसेच पुढारी, पोस्टमन, शेतकरी आणि सध्या बालचमूंमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाहुबली रूपातील गणेशमूर्तीपण दिसू लागल्या.
शिवाजी महाराज, सुभाष बाबू, जवाहरलाल नेहरू ही मंडळी; पण गणेशरूपात दिसू लागली. त्यामुळे भाविकभक्तांच्या भावना दुखावू लागल्याने गणेशमूर्तींची विडंबनरूपातील प्रदर्शनेबंद झाली.

Web Title: Bappa Moriah Ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.