‘विशेष’ मूर्तिकार साकारतायत बाप्पा!
By Admin | Published: August 23, 2016 01:41 AM2016-08-23T01:41:18+5:302016-08-23T01:41:18+5:30
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय.
महेश चेमटे,
मुंबई- गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम मूर्तीशाळांमध्ये सुरू असतानाच, मुंबईतील महालक्ष्मी येथे ‘विशेष’ मूर्तिकारांनी बनविलेल्या शाडूच्या मातीचा बाप्पा रूपाला येत आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या विळख्यात सापडलेल्या घरगुती मूर्तींना शाडूच्या मातीतून श्वास देण्याचा प्रयत्न हे ‘विशेष मूर्तिकार’ करीत असतात.
‘विशेष’ विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य आणि सक्षमीकरणासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर असलेल्या समाजातील ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी’ ओम क्रिएशन संस्था गेली २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ‘विशेष’ विद्यार्थ्यांना घेऊन अगरबत्ती स्टँडपासून सुरुवात करणाऱ्या हातांनी गेल्या सात वर्षांपासून बुद्धिदेवता अर्थात, गणपती मूर्ती साकारण्यास सुरुवात केली आहे.
आजमितीला हे मूर्तिकार ९ ते २४ इंच उंची असलेल्या विविधरूपी गणेशमूर्ती साकारतात, तसेच मूर्तीच्या आभूषणांना नैसर्गिक रंगांनी रंगरंगोटीदेखील करतात. ट्रस्टमध्ये २२ ते ४५ वयोगटांतील विशेष मुले आहेत. या कार्यशाळेत विशेष विद्यार्थ्यांच्या हाताने यंदा ५६ ‘विशेष’ मूर्तिकारांनी तब्बल ७० गणेशमूर्ती साकारत आहेत. या मूर्तींची विक्री करून मिळणारे पैसे त्या मुलांना मोबदला म्हणून देण्यात येतो. या मोबदल्याुमळे अनेकांनी घर चालवल्याचे उदाहरणे आहेत. त्याचबरोबर, रिकाम्या काचेच्या बाटल्यांपासून दिवे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्यात ही मुले पारंगत आहेत. गणपती म्हणजे काय? यापासून ते मूर्तीचे वैशिष्ट्ये, आभूषणे का आहेत? या सर्वांचे उत्तर त्यांना समजावून सांगितले जाते. अनेकदा शहरातील मूर्ती कारखान्यांना भेट देऊन वेगवेगळ््या मूर्ती त्यांना दाखविल्या जात असल्याची माहिती ट्रस्टचे समन्वयक अर्चना मेहता यांनी दिली.
>मूर्तिकारांची निरागसता समाधान देणारी
मूर्ती बनवताना त्यांची निरागसता मूर्तीतून प्रकट होते. त्यामुळे आपण जेव्हा मूर्ती घेतो, त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप समाधान देऊन जातो. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या शाडूच्या मूर्ती घरोघरी जाणीवपूर्वक स्थापन केली पाहिजे. यामुळे प्रदूषणाला आळा बसतो.
- डॉ. संध्या कामत, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय