बाप्पाचा वीकेंड हाऊसफुल्ल
By admin | Published: September 26, 2015 03:17 AM2015-09-26T03:17:15+5:302015-09-26T03:17:15+5:30
गणेशोत्सवाचे शेवटच्या तीन दिवशी बकरी ईद, चौथा शनिवार आणि अनंत चतुर्दशी अशा सलग तीन सरकारी सुट्ट्या आल्याने बाप्पाचा विकेंड हाऊसफुल्ल ठरणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवाचे शेवटच्या तीन दिवशी बकरी ईद, चौथा शनिवार आणि अनंत चतुर्दशी अशा सलग तीन सरकारी सुट्ट्या आल्याने बाप्पाचा विकेंड हाऊसफुल्ल ठरणार आहे. शुक्रवारी पहिल्याच सुट्टीच्या दिवशी भक्तांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करत पुढील दोन दिवसांत उसळणाऱ्या महासागराची सूचना दिली आहे.
आज सकाळपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींच्या दर्शनासाठी रांगा लागू लागल्या होत्या. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, अंधेरीचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती अशा काही गणपतींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गर्दी आवरण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली होती. त्यामुळे सुट्टी असतानाही बेस्ट आणि ट्रेनला दिवसभर गर्दी दिसली. नरे पार्क, शिवडीचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण, काळाचौकीतील शहीद भगत सिंग मैदानांसह मुंबई उपगनरांतील बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त जत्राही भरल्या आहेत.
याठिकाणीही गणेशभक्तांनी हजेरी लावत मनमुराद आनंद लुटला. आकाश पाळणे, फन बलून, फुगे फोडणे अशा विविध साधनांतून तरुणांसह बच्चेकंपनीनेही धमाल केली. शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने सार्वजनिक मंडळांमध्ये अहवाल प्रकाशनाची लगीनघाई दिसून आली. जाहिरातदार, देणगीदार, वर्गणीदार यांच्या नावासह सामाजिक उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी छापण्यात येणारे अहवाल प्रकाशित करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रिटींग प्रेसच्या चक्करा मारत होते.