बारा लाख घेऊन कारचालक फरार!
By admin | Published: March 30, 2016 01:00 AM2016-03-30T01:00:04+5:302016-03-30T01:00:04+5:30
मुंबई येथील लोखंड व्यापाऱ्याची वसुली केलेली १२ लाखांची रोकड घेऊन कारचालक पळून गेला. साताऱ्यात संगमनगर येथील पेट्रोल पंपासमोर एका व्यापारी संकुलासमोर कार सोडून
कोरेगाव (सातारा) : मुंबई येथील लोखंड व्यापाऱ्याची वसुली केलेली १२ लाखांची रोकड घेऊन कारचालक पळून गेला. साताऱ्यात संगमनगर येथील पेट्रोल पंपासमोर एका व्यापारी संकुलासमोर कार सोडून त्याने पलायन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे नरेशकुमार रतनलाल ओझा यांची अनंत एंटरप्रायझेस नावाची फर्म आहे. ते राज्यातील व्यापाऱ्यांना लोखंड पुरवतात. याच फर्ममध्ये जयंतीलाल गिरिधारीलाल त्रिवेदी हे वसुलीचे काम पाहतात. त्यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या वसुलीचे काम सोपविण्यात आले आहे. अनंत एंटरप्रायझेसमध्ये तेज बहादूर गिरी हा चालक म्हणून काम करत होता. तो जोगेश्वरी पूर्व येथे वास्तव्यास आहे. ओझा यांच्या सूचनेप्रमाणे त्रिवेदी व गिरी हे दोघे सोमवारी सकाळी कार मधून सातारा जिल्ह्यातील वसुलीसाठी बाहेर पडले. सायंकाळी सहाच्या सुमारास ते दोघे कोरेगाव येथे पोहोचले. येथील मोहन स्टील सेंटरमधून दोन लाखांची रोकड जमा करून घेत त्रिवेदी यांनी सर्व रक्कम ११ लाख ७९ हजार ६०० रुपये कारच्या बॅगेमध्ये ठेवली. चालक गिरी हा गाडीतच बसून होता. त्रिवेदी हे मोहन स्टील सेंटरमध्ये व्यावसायिक बोलणी करत होते. कोरेगावातून कऱ्हाड येथे जायचे असल्याने त्यांनी चालक गिरी याच्या मोबाईलवर संपर्क साधून, ‘आपल्याला निघायचे आहे, तू कोठे आहेस,’ अशी विचारणा केली. त्यावर त्याने नैसर्गिक विधीसाठी आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद केल्याचे लक्षात आले. तेज बहादूर गिरी हा गाडीसह रोकड घेऊन पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मुंबईत ओझा यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
तेज बहादूरचे कुटुंबही गायब
चालक तेज बहादूर गिरी हा कोरेगावातून रोकड घेऊन पसार झाल्याचे समजल्यानंतर मुंबईतील व्यापारी नरेशकुमार ओझा यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना गिरी याच्या जोगेश्वरीतील घरी पाठविले. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याचे कुटुंबीय घर सोडून गायब झाल्याचे समजले.