बराखीतला कांदा गेला सडून
By admin | Published: February 27, 2017 01:00 AM2017-02-27T01:00:29+5:302017-02-27T01:00:29+5:30
कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बराखीत तसाच सोडून दिला आहे.
मंचर : कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बराखीत तसाच सोडून दिला आहे. कांदा बराखीत सडून गेला असून, कांद्याला कोंब आले आहेत. सडलेल्या कांद्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोठ्या कष्टाने आणि भांडवल गुंतवून घेतलेले कांदा पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.
कांदा पिकाला यावर्षी अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतो. सुरुवातीपासून कांद्याला बाजारभाव नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा बराखी बनवून ठेवल्या आहेत. या बराखीसाठी त्यांना बराच खर्च यापूर्वीच करावा लागला आहे. बराखीत कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागला. कांद्याचा बाजारभाव वाढल्यावर शेतकरी बराखीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढणार होता.
वर्षभर कांद्याचे बाजारभाव वाढलेच नाहीत. आधीच कांदा पिकाला मोठा खर्च करावा लागला होता. आता मिळणाऱ्या बाजारभावाने भांडवलही वसूल होणार नव्हते. त्यामुळे बराखीतील कांदा बाहेर काढून तो बाजारात विक्रीसाठी नेण्यास शेतकरी उत्सुक नव्हता. बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांनी बराखीतच सोडून दिला आहे. बराखीतील कांद्याला सुरुवातीला कोंब आले. हळूहळू तो सडू
लागला आहे. कांद्याच्या बराखीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहात आहे. सडलेल्या कांद्याची दुर्गंधी पसरू लागली आहे. (वार्ताहर)
>सध्या नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. कांद्याला १० किलोला ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळतोय. गुलटी २५ ते ४०, तर बदला कांदा १५ ते २५ रुपये १० किलो या भावाने विकला जातोय. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. शिवाय यावर्षीचे वातावरण कांदा पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे भविष्यात कांदा पिकाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे.