बारामती, इंदापुरात गुटखाबंदीचा फार्स

By admin | Published: October 24, 2016 01:24 AM2016-10-24T01:24:38+5:302016-10-24T01:24:38+5:30

राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. त्याचबरोबर उत्पादनालादेखील बंदी आहे. मात्र, परराज्यांतून बारामती, इंदापूरमध्ये गुटखा आणून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची साखळी आहे

Baramati, Gatkababadi Fars in Indapur | बारामती, इंदापुरात गुटखाबंदीचा फार्स

बारामती, इंदापुरात गुटखाबंदीचा फार्स

Next

बारामती / इंदापूर : राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. त्याचबरोबर उत्पादनालादेखील बंदी आहे. मात्र, परराज्यांतून बारामती, इंदापूरमध्ये गुटखा आणून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची साखळी आहे. त्यामुळे ‘गुटखाबंदी’चे धोरण कागदावरच राहिले आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याकडूनदेखील ‘मॅनेज’ कारवाई केली जाते. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील व्यापाऱ्यावर मागील आठवड्यात या खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची चर्चा जोरदार आहे.
लासुर्णे गावात भर व्यापारपेठेत हा व्यापारी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करतो. याची माहिती जंक्शन (वालचंदनगर) पोलिसांनादेखील आहे. या पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याची खास उठबस या व्यापाऱ्याबरोबर होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर मागील आठवड्यात त्यांच्या व्यापार पेठेतील दुकानावर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने धाड टाकली. जवळपास ६० ते ७० लाख रुपयांचा गुटखा होता, असे सांगितले जाते. मात्र, कारवाईत २५ लाख रुपयांचाच गुटखा जप्त केल्याचे सांगण्यात आले. भरदिवसा ही कारवाई झाली. परंतु, उर्वरित मालासाठी झालेली तडजोड लाखोंची होती, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)

१ राज्यात गुटखाबंदीचा निर्णय दोन वेळा झाला; मात्र बंदी सोडाच, परंतु त्याची संधी घेऊन गुटखा विक्री, मालाचा साठा बारामतीत असतो. विशेषत: गुटख्यावर बंदी आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला होता. परंतु, बारामतीतच चार ते पाच व्यापारी मोठ्या प्रमाणात परराज्यांतून ट्रक, टेम्पो, आयशर गाड्यांनी गुटखा विक्रीसाठी आणतात. त्याचे आगार बारामतीत आहे. परंतु, या व्यापाऱ्यांची इंदापूर, पुरंदर, फलटण, दौंड या तालुक्यांमध्येदेखील गोडावून आहेत.

२बारामतीच्या व्यापाऱ्यांचे थेट अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे कारवाई होत नाही. कारवाई करायची असेल तर पुण्यातून गाड्या निघाल्यावर व्यापाऱ्यांना त्याची माहिती मिळते, हे विशेष. त्यामुळे गोडावूनमधील माल सुरक्षित ठिकाणी हलविला जातो. लासुर्णे येथील व्यापाऱ्यावर कारवाई करतानादेखील अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याचे पथक बारामती, इंदापूरमध्ये येणार असल्याची माहिती होती.


३ परंतु, कारवाई झालेल्या व्यापाऱ्यालादेखील त्याची माहिती देण्यात आली होती. परंतु, नेमकी कारवाई कोणत्या व्यापाऱ्यावर होणार, याची पथकातील ‘खबऱ्या’ला माहिती नव्हती. कारवाई झाली. २० ते २५ लाखांचा माल जप्त झाला. उर्वरित मालासाठी मात्र आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारला खऱ्या अर्थाने गुटखा विक्रीवर बंदी आणायची आहे का, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

४‘कुंपणच शेत खात’ असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे गुटख्यावरील बंदी कागदोपत्री आहे. कर्नाटक, आंध्र आदी राज्यांतून लाखो रुपयांचा माल येतो. रातोरात त्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे गुटखा विक्रीवर होत असलेली कारवाई ‘तडजोडी’ची ठरत आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याकडून ठोस कारवाई झाली पाहिजे. तसेच, पोलिसांकडून किरकोळ दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

गुटखा विक्रीने मालामाल...
बंदी असल्यामुळे चढ्या दराने व्यापारी किरकोळ दुकानदारांना माल विकतात. एमआरपीपेक्षा ५ ते १० पट अधिक दराने विक्री होते. बारामतीच्या कसबा, जामदार रोड भागातील मुख्य व्यापाऱ्यासह ५ ते ६ व्यापारी मालामाल झाले आहेत. गुटखाबंदी ही पर्वणीच समजून ट्रक, टेम्पोने मालाची विक्री केली जाते. यदाकदाचित माल पकडलाच तर जागेवर तडजोड करण्यासदेखील व्यापारी मागेपुढे पाहत नाहीत. काही वर्षांपूर्वी अल्पभूधारक असलेले व्यापारी आता बागायतदार म्हणून वावरू लागले आहेत.

इंदापूरमध्येदेखील
असेच प्रकार...
इंदापूर शहरातील गुटखा विक्रीवर कारवाई करण्याऐवजी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी गुटखा विक्रेत्यांना पकडून आर्थिक तडजोड करून, केवळ तंबी देण्याची कारवाई करत असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत असे प्रकार सतत घडत आहेत. गुटखा विक्री करणाऱ्याला गुटख्यासह पकडायचे. दबाव आणण्यासाठी कागद रंगवण्याचा बहाणा करायचा. तोपर्यंत स्थानिक कोणी तरी मध्यस्थ होतो. ‘साहेब कशाला वाढवताय? मिटवून घ्या,’ असे सांगतो. लालूच दाखवतो. साहेब आढेवेढे घेतात. हे नाटक समाधानकारक आकडा गाठेपर्यंत चालू राहते. मात्र, समाधानकारक तडजोड झाली, की अधिकारीदेखील खूश होतात. विक्रेताही धंद्याला जीवदान मिळाले म्हणून नि:श्वास सोडतो. सारे कसे आलबेल होते. कारवाईची लक्तरे होतात. या बाबींमुळे कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारीच आहेत की कुणी तोतया चोरावर मोर होतो आहे, अशी शंका लोकांमधून व्यक्त होते.

Web Title: Baramati, Gatkababadi Fars in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.