बारामती लोकसभेची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:32 PM2024-04-05T20:32:51+5:302024-04-05T20:52:00+5:30
Loksabha Election 2024: महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे वसुली सरकार अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख केला
शैलेश काटे
इंदापूर - Devendra Fadnavis in Baramati ( Marathi News )
बारामती लोकसभा निवडणूक शरद पवारविरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे बारामतीचा खासदार नरेंद्र मोदी यांच्या विकासयात्रेमध्ये चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी व देशाच्या विकासाचा अजेंडा नेस्तनाबूत झाला पाहिजे अशा मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मतदारसंघात कोणी ही निवडून आले तरी देशात फार मोठा बदल घडणार आहे असे नाही. परंतु देशात बदल घडवणार्यांना कोण साथ देवू शकते याची ही खरी लढाई आहे. महायुतीचा उमेदवार निवडून आला तर मोदींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल. दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले. त्या प्रत्येक निर्णयाला खा. सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. अगदी काश्मीरचे ३७० कलम हटवण्याचा विधेयकास देखील त्यांनी विरोध केला. ही निवडणूक पुढे वेगवेगळ्या भावनिक मुद्यांवर जाईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या भरवशावर क्रांती करता येवू शकेल असा विश्वास निर्माण होईल इतपत तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासह इंदापूर तालुक्याचे पालकत्व स्वीकारण्यासाठी आपण आलो आहोत, असे सांगून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेल्या ताकदीचा उपयोग, इंदापूर तालुक्याकरिता व हर्षवर्धन पाटील यांना ताकद देण्याकरिता कसा करता येईल हे केल्याशिवाय आपण रहाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. या वेळी हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी जिल्ह्यातील भाजपच्या कामाचा आढावा देताना कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट केली. भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांचे भाषण झाले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे वसुली सरकार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख करत, एकमेकांच्या विरोधात लढलेल्या लोकांनी केवळ खुर्चीकरिता युती केल्याची टीका फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीत सहभागी होण्याच्या कृतीची भलावण करताना, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना स्थापनेच्या उद्देशाला काळीमा फासण्याचे काम चालले होते.केवळ पुत्राकरिता निर्णय घेतले जात होते म्हणून सहका-यासमवेत बाहेर पडण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. तर राज्य व देशाचा विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असा अजित पवार व त्यांच्या सहका-यांचा विचार होता. संघटीतपणे मोदींची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांना महायुतीत सहभागी करुन घेतले असा दावा फडणवीस यांनी केला