पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:01 PM2024-05-05T18:01:06+5:302024-05-05T18:01:57+5:30
तिसऱ्या टप्प्यात राज्यातील असे काही मतदारसंघ आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Rohit Pawar : आज तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराचा धुरळा खाली बसणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष शक्य तेवढे शक्तीप्रदर्शन आणि सभांच्या माध्यमांतून आपला प्रचार करत आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील असे काही मतदारसंघ आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत इथे होत आहे. प्रथमच पवारांच्या घरातील दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी बारामतीत प्रचारसभा घेत एकमेकांवर टीकेचे बाण सोडले.
इतिहासात प्रथमच बारामतीत दोन सभा होत आहेत. एकिकडे अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मत मागत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात आहेत. शरद पवार आणि अजित पवार दोघांची सभा होत आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बोलताना आमदार रोहित पवार गहिवरले. त्यांनी अजित पवार गटासह महायुतीवर सडकून टीका केली. अजित पवारांच्या शब्दाला तिकडे किंमत नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी शरद पवारांचे शब्द सांगितले अन् सारेच स्तब्ध झाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवर बऱ्याच बातम्या सुरू होत्या. तेव्हा शरद पवार साहेबांप्रमाणे आम्ही देखील सर्वकाही पाहत होतो. पण पवार साहेबांच्या भावना सर्वकाही सांगत होत्या. मात्र, परिस्थिती तशी असताना देखील त्यांनी काळजी करू नका असे आम्हाला सांगितले होते.
तसेच रोहित पवारांनी शरद पवारांनी सांगितलेले शब्द उच्चारताना त्यांना अश्रू अनावर झाले. "जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोवर मी डोळे मिटणार नाही", असे पवार साहेबांनी सांगितले असल्याचा खुलासा रोहित पवारांनी केला. त्यांनी हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच सन्नाटा पसरला. सर्वजण स्तब्ध झाले... हा प्रसंग सांगताना रोहित पवार ढसाढसा रडू लागले. मग पुन्हा हे शब्द वापरू नका आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांना दिली.