बारामतीतील टँकर कमी होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 01:25 AM2016-06-10T01:25:52+5:302016-06-10T01:25:52+5:30
२२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे
बारामती : तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील २५ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांतील ७४ हजार २४ एवढ्या लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यांतील १ लाख ४४ हजार ४४६ लोकांना शासनाच्या वतीने ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
बारामती उपविभागात या वर्षी पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपविभागातील बारामती तालुक्यात ३४, तर इंदापूर तालुक्यात २३ अशा एकूण ५७ टँकरनी दोन्ही तालुक्यांतील मिळून एकूण १ लाख ४४ हजार ४४६ लोकसंख्येला शासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना, तर इंदापूर तालुक्यातील २५ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सलग तीन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मागील आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने फळबागांचे नुकसान झाले.
मात्र, सध्या ओढा, नाले खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. ज्या भागात पाऊस पडला, तेथे पाणी साठून राहण्यास मदत झाली. मात्र, टँकरची संख्या अद्याप कमी झालेली नाही.
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी क.प., मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजुबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायबाचीवाडी, भिलारवाडी, वाढाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे, गाडीखेल, मोढवे, मोरगाव, पारवडी, जैनकवाडी, सावळ या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईच्या गावातील एकूण लोकसंख्या ७० हजार ४२२ इतकी आहे.
इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी - २, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौटळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहळी, घोरपडवाडी, कचरवाडी, निमगाव केतकी, कडबनवाडी, अकोले, निरनिमगाव, काटी, लामजेवाडी, भादलवाडी, पिटकेश्वर या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांना २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावांतील एकूण लोकसंख्या ७४ हजार ०२४ इतकी आहे. या भागातील खासगी ९, तर २ शासकीय बोअर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.