बारामतीकरांचा ‘ताप’ उतरेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 01:29 AM2016-11-03T01:29:19+5:302016-11-03T01:29:19+5:30
यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.
बारामती : थंडीचा कालावधी आरोग्यदायी समजला जातो. मात्र, यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांची दिवाळी आजारपणाला तोंड देण्यातच गेल्याचे चित्र आहे.
शहरातील डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. डासांचे वाढते प्रमाण रोखण्यास नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. परिणामी विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये डेंगीसदृश रुग्णदेखील आढळत आहेत. बारामती शहरातील डॉ. आर. डी. वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेने चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे.
यंदा या आजारासह डेंगीसदृश आजाराचे गतवर्षीच्या तुलनेने रुग्ण जास्त आहेत. त्यामध्ये सांधेदुखीसह थंडीताप, उलटी, मळमळणे ही लक्षणे आढळून येत आहेत. तसेच शहरातील डॉ. पे्रमेंद्र देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की चिकुनगुनिया, चिकुन गुनियासदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
अनेकांची दिवाळी साजरी झालीच नाही. दिवाळी आजारपणातच गेली. सांधेदुखी, ताप, अंगदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळणारे रुग्ण दवाखान्यात येतच आहेत. यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यावरच त्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. तर, नागरिकांनी डासांपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करावा.
भवानीनगर येथील डॉ. राकेश मेहता यांनी सांगितले, की काटेवाडी (ता. बारामती) परिसरात अद्यापही डेेंगीचे रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. तर, गोचीडतापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळत आहेत. याशिवाय, विषाणुजन्य तापाचे रुग्णांची संख्या मोठी आहे.
यासाठी रुग्णांची प्रतिकारक्षमतादेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. परिपूर्ण आहार, कडधान्ये, पालेभाज्यांचा आहारात समावेश प्राधान्याने करायला हवा. प्रतिकारक्षमता विकसित केल्यास विविध आजाराच्ंया रुग्णांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. लहान मुलांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण आहेत. सध्या दिवाळीच्या फराळाचा आग्रह सर्वत्र होताना दिसतो. त्यामुळे जुलाब, पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अति तेलकट पदार्थ टाळावेत. थंडीचा काळ खरे तर आरोग्यदायी मानला जातो; मात्र यंदा हा काळ आरोग्यदायी व अनुकूल नसल्याचे चित्र आहे. विविध आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. (प्रतिनिधी)
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी चिकुनगुनिया, गोचीडतापाच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने शहरात कमी आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साठविताना दक्षता घ्यावी. कोरडा दिवस पाळावा. या आजारांचे प्रमुख कारण डासांची उत्पत्ती हेच आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात चिकुनगुनिया, गोचीडताप या आजारांचे प्रमाण तुरळक असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने वेळेत याबाबत दक्षता घेतली; त्यामुळे या रुग्णांचे प्रमाण तुरळक आहे.
नारळाच्या करवंट्या, रिकामे टायर नष्ट करावेत. नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा आहे.
शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांचा अहवाल गुरुवारी (दि. ३) मिळणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल.