बारामतीचा जिरायती भाग होरपळणार

By admin | Published: April 5, 2017 01:16 AM2017-04-05T01:16:45+5:302017-04-05T01:16:58+5:30

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते.

Baramati's Jorhat will run | बारामतीचा जिरायती भाग होरपळणार

बारामतीचा जिरायती भाग होरपळणार

Next

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते. मागील पाच वर्षांपासून या भागाला दुष्काळाने ग्रासले आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येथील
जनतेवर आली आहे.
बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली आहे. विहिरी, कूपनलिका, विंधनविहिरी आदींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सध्या घरातील माणसांना पिण्याच्या पाण्याची तजवीज करताना धावपळ करावी लागत असताना दारातील जनावरांना पाणी आणायचे कोठून, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
तालुक्याच्या मोरगाव ते कऱ्हावागज या २२ गावांपैकी मोरगाव-बारामती रस्त्यालगतच्या मोरगाव, आंबी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी लोणी, जळगाव क. प. या गावांना नाझरे जलाशयावरील पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे याही भागातून स्वतंत्र टँकरची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या दोन ते तीन टाक्या व सार्वजनिक विहीर नळ योजना आहे.
परंतु स्थानिक पाण्याचे स्रोतच आटल्याने एकेका गावात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ही गावे तहानलेलीच आहेत. त्यामुळे निदान या सरकारने तरी या भागासाठी कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात रब्बी हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांपुढे चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
या भागातील पशुधन वाचविण्यासाठी व दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी चारा मिळणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. रब्बी हंगामात या संपूर्ण पट्ट्यात ज्वारीचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. यंदा या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. थोड्याफार ओलीवर पेरणी केलेल्या ज्वारीची यंदा नंतरच्या पावसाअभावी ज्वारी पिकाची वाढच झाली नाही. (वार्ताहर)
टँकरसाठी प्रस्ताव दाखल
तालुक्यातील जिरायती पट्ट्यात मागील पाच वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. या वर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पाऊसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. काळखेरवाडी, मुर्टी, देऊळगाव रसाळ, सावळ, जैनकवाडी, भोंडवेवाडी, मोराळवाडी, मुढाळे, पारवडी, जळगाव सुपे आदी गावांमधून ११ टँकरसाठी ११ प्रस्ताव पंचायत समितीला आले आहेत. टँकरमंजुरीसाठी हे प्रस्ताव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत.

Web Title: Baramati's Jorhat will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.