‘बारामतीची वाट लावणारा जन्माला यायचा आहे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 11:38 PM2016-10-22T23:38:39+5:302016-10-22T23:38:39+5:30
राजकारणात आम्ही कधी कंबरेखाली वार केले नाहीत. खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही. मात्र, काही वाचाळवीर मंत्री बारामतीविषयी बोलतात. बारामतीची
बारामती : राजकारणात आम्ही कधी कंबरेखाली वार केले नाहीत. खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही. मात्र, काही वाचाळवीर मंत्री बारामतीविषयी बोलतात. बारामतीची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचे नाव न घेता केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. वैयक्तिक टीका केली असती, तर गप्प बसलो असतो, परंतु बारामतीविषयी कुणी बोलले, तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून पवार म्हणाले, ‘राजकारणात आम्ही काय चुकीचे बोललो, तर त्याचा पश्चात्ताप म्हणून आत्मक्लेश करण्याची तयारी दाखवली. विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. जे बारामतीचे वाटोळे करायला निघाले, त्यांना त्यांची जागा बारामतीकरांनी दाखवून द्यावी. बारामतीचे नाव घेऊन ते मोठे झाले. मंत्री झाले, तेच बारामतीचे वाटोळे करायला निघाले. शेतीमालाच्या भावासाठी आंदोलन करणारे आता राज्यकर्ते झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही. महागाई वाढल्याचे कोणाला सोयरसुतक नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. मागच्या वर्षीचाच एफआरपी दर या वर्षीदेखील आहे. आता कुठे गेले राजू शेट्टी, सदाभाऊ खोत? असा प्रश्न विचारून या नेत्यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)