बीएआरसीची महिला वैज्ञानिक बेपत्ता
By admin | Published: January 26, 2017 05:33 AM2017-01-26T05:33:15+5:302017-01-26T05:33:15+5:30
भाभा अणुसंशोधन केंद्रातील महिला वैज्ञानिक बेपत्ता झाली असून मनस्ताप असह्य झाल्यामुळे आपण निघून जात असल्याचा त्यांचा ई-मेल आल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार
नवी मुंबई : भाभा अणुसंशोधन केंद्रातील महिला वैज्ञानिक बेपत्ता झाली असून मनस्ताप असह्य झाल्यामुळे आपण निघून जात असल्याचा त्यांचा ई-मेल आल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या सोमवारपासून बेपत्ता आहेत.
बबिता विजय सिंह असे या वैज्ञानिकाचे नाव असून त्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत. मागील काही वर्षांपासून त्या अणुशक्तीनगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात रेडिएशन रिसर्च विभागात संशोधक म्हणून काम करत होत्या.
बबिता सिंह या सध्या नेरुळ सेक्टर २० येथील द्वारकानाथ सोसायटीत रहातात. त्याठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सोमवारी दुपारी १ वाजता शेवटच्या दिसल्या आहेत. यानंतर त्यांचा कोणाशी संपर्क झालेला नाही. तर आपला मोबाइल देखील घरात ठेवून त्या निघून गेलेल्या आहेत. याच दिवशी बबिता यांनी नातेवाइकांना ई-मेल करून मनस्ताप असह्य होत असल्याने आत्महत्येची इच्छा होत असल्याची भावना व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)