‘बॅरिस्टर’ गेले!
By Admin | Published: December 3, 2014 04:03 AM2014-12-03T04:03:16+5:302014-12-03T04:03:16+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर अब्दुल रहेमान तथा ए. आर. अंतुले (८५) यांचे मंगळवारी सकाळी ब्रीच कँडी इस्पितळात किडनीच्या आजाराने निधन झाले.
मुंबई : गेली पाच दशकं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविलेले, धडाडीचे प्रशासक आणि एक द्रष्टा मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर अब्दुल रहेमान तथा ए. आर. अंतुले (८५) यांचे मंगळवारी सकाळी ब्रीच कँडी इस्पितळात किडनीच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अविरत कार्य करणारा लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
अंतुले यांच्या पश्चात पत्नी नर्गिस, पुत्र नविद, नीलम, मोबिना आणि शबनम या तीन कन्या आणि जावई माजी आमदार मुश्ताक अंतुले तसेच उच्च न्यायालयाचे न्या. अहमद सय्यद असा मोठा आप्त परिवार आहे. कोकणचे सुपुत्र असलेले अंतुुले यांच्यावर रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील आंबेत या त्यांच्या जन्मगावी बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.