मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:03 PM2024-10-09T16:03:48+5:302024-10-09T16:05:50+5:30

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मॅनेज असून महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकवण्यासाठी तुम्ही हे करताय का असा आरोप आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर केला होता.

Barshi independent MLA Rajendra Raut, who had a clashes between Manoj Jarange Patil over Maratha Reservation, announced to contest the election from the BJP | मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

सोलापूर - मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील भाजपाला विशेषत: देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आहेत. त्यावरून जरांगेंशी पंगा घेणारे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी येणारी विधानसभा निवडणूक भाजपाकडून लढणार असल्याची घोषणा केली आहे. ज्या सरकारने आपल्या भागाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला, त्या पक्षाला साथ देणे आपलं कर्तव्य आहे. मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने येत्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी न लढता भाजपाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतला आहे.

आमदार  राजेंद्र राऊत म्हणाले की, मी भाजपाचा उमेदवार असणार आहे. आमच्या सहकाऱ्यांची भावना होती, भाऊंनी अपक्ष उभं राहावे, प्रत्येकाने मत व्यक्त केले. परंतु नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आज माझ्या मतदारसंघाला एकाच वेळी ७०० कोटींची कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आसपासच्या नगरपालिकांना २०० कोटी निधी मिळणे, मतदारसंघात २ एमआयडीसी मंजूर झाल्यात. हजारो कोटीचा निधी, थेट रोजगार, योजनांचा लाभ लोकांना मिळत आहे. भरभरून तालुक्याकरता मिळत असेल, त्यासाठी भाजपाने आणि सरकारने काम केले असेल तर ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्यांच्यासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांनी आपल्याला सांभाळले, या तालुक्याकरता केले, शेतकऱ्यांच्या पोराबाळांना सोन्याचा घास भरवण्याचे प्रयत्न केले. येणाऱ्या ८ महिन्याच्या आत मतदारसंघातील ५० हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे हे मी लिहून देतो, माझ्या शेतकऱ्याच्या घराला सोन्याचे दिवस येणार असतील. जमिनी बागायत होणार असेल. एमआयडीसी, दळववळण मतदारसंघात वाढणार असेल तर मग राजकारणाचा अर्थच काय? ज्याने चांगले काम केले त्याच्यासोबत राहणे गरजेचे आहे असंही आमदार राजेंद्र राऊतांनी म्हटलं.

कोण आहेत राजेंद्र राऊत?

राजेंद्र राऊत हे बार्शीचे अपक्ष आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत बार्शीची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने राजेंद्र राऊत यांनी बंड पुकारात अपक्ष निवडणूक लढली होती.  मात्र यंदा महायुतीचे जागावाटप होण्याअगोदरच राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभेत भाजपाचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केले. राजेंद्र राऊत यांचा शिवसेना,काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा असा राजकीय प्रवास राहिला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी राजेंद्र राऊत यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांची ओळख आहे.  भाजपा आणि महायुती सरकारकडून बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचं राजेंद्र राऊत यांनी सांगितले. 

 मनोज जरांगेसोबत झाला होता वाद

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात मागील काळात आरोप प्रत्यारोप सुरू होते. राऊत म्हणाले होते की, माजलगावच्या सभेत जरांगेंनी म्हटलं, राजेंद्र राऊतच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पाहा, तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल, महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचं पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल असं आव्हान राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले होते. बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मराठा समाजाचे स्थानिक नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात जरांगे पाटलांविरोधात १ दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मनोज जरांगे यांना विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने शिंदे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. तुम्ही आमचे नेते आहात, आम्ही तुम्हाला काही शंका विचारली त्यावर तुम्ही राजेंद्र राऊत, देवेंद्र फडणवीसांवर बोलले परंतु आम्ही काय विचारतोय त्यावर उत्तर दिले नाही. तुम्हाला समाजाने काही शंका विचारायची नाही का?, समाजाने तुम्हाला काय प्रश्न विचारायचे नाहीत का? समाजातून काही प्रश्न आले, ते आम्ही विचारल्यावर तुम्ही उत्तर न देता त्यात राजकारण का घातलं? असा सवाल अण्णासाहेब शिंदेंनी उपस्थित केला होता.
 

Web Title: Barshi independent MLA Rajendra Raut, who had a clashes between Manoj Jarange Patil over Maratha Reservation, announced to contest the election from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.