'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 04:12 PM2023-04-28T16:12:05+5:302023-04-28T16:12:38+5:30
आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
कोल्हापूर - रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला बारसूच्या स्थानिकांनी विरोध केला आहे. गेल्या ४ दिवसांपासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. केंद्राकडून आलेल्या सर्वेक्षण पथकाला स्थानिकांनी विरोध केला आहे. या आंदोलनकर्त्यांनी बळजबरीने सर्वेक्षणस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. बारसूतील तणावग्रस्त परिस्थितीवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारला इशारा दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी बारसूतील शेतकरी एकाकी आहेत. म्हणून पोलीस दडपशाहीचा वापर करून जर हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असेल. तर मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हाक देतो. चला बारसूला, तेथील शेतकऱ्यांना वाचवूया. बघू यांच्याकडे गोळ्या किती, लाठ्या किती आहेत. पोलीस किती आहेत. आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
तसेच बारसू येथे झालेल्या पोलीस दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी स्त्री पुरुषावर बेशुद्ध होईपर्यंत प्रचंड लाठीचार्ज झालेला आहे. बारसू कोकणात आहे, महाराष्ट्रात आहे का की आणखी कुठे आहे हे कळत नाही. या लोकशाहीत जर एखाद्याला जमीन द्यायची नसेल अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली आणि त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर पोलिसांना आणि त्यांना आदेश देणाऱ्या राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी अशा शब्दात राजू शेट्टींनी घणाघात केला.
बारसू पेटलं...
बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाविरोधात महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला.
आंदोलन भडकवण्यामागे षडयंत्र
काहीजण लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत ते थांबवावे. शेतकऱ्यांना पुढे करून ज्यापद्धतीने राजकारण केले जातेय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक राजकारण आहे. खासदारांना काय शंका असतील त्या दूर करू. सर्वेक्षणाठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू शकतात. पण लोकांची माथी भडकावू नका. राजापूरच्या गेस्टहाऊसला कुणाची बैठक झाली? यामागचे षडयंत्र काय हे समोर आणा. पोलीस आक्रमक झालेत हे दाखवून द्यायचे आहे असा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.