‘बार्टी’त जाहिरातीविनाच पदभरती!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:11 AM2020-02-15T05:11:18+5:302020-02-15T05:11:27+5:30
सावळा गोंधळ : माजी मंत्री बडोले यांच्या पीएच्या बंधूची वर्णी
धनाजी कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) गेल्या काही महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरु आहे. कधी प्रसूती रजा, तर कधी समतादूत प्रकल्पावरून चर्चेत राहणाऱ्या बार्टीने कोणतीही जाहिरात, परीक्षा, मुलाखत अशी प्रक्रिया न करता पदभरती केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एका कर्मचाºयानेच तक्रार केली असून, माहितीच्या अधिकारात तपशील मागितला आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
एका महिला कर्मचाºयाने याबाबत महासंचालक आणि निबंधक यादव गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, बार्टीने तब्बल ११ अधिकाऱ्यांची पदभरती केली आहे. तसेच काही जवळच्या लोकांना पदोन्नती दिली आहे.
यात भीमराव पारखे, नरेंद्र पटेल, पद्मश्री पाटील, सुभाष परदेशी, प्रमोदिनी नाईक, आरती जाधव, नसरीन तांबोळी, दत्ता शेटे, जी. जी. निकम, पंकज माने, लालासाहेब जाधव यांचा समावेश आहे. यातील पंकज माने हे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे पीए रवींद्र माने यांचे बंधू असून, त्यांना प्रकल्प संचालक म्हणून घेतले आहे. पारखे हे महासंचालक कणसे यांच्या जवळचे असून, निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना प्रकल्प संचालक हे पद दिले आहे.
सरकारी अधिकाºयांना नोकरीत घेऊ शकतो
बार्टी ही स्वायत्त संस्था असल्याने जाहिरातीची आवश्यकता नाही. निवृत्त सरकारी अधिकाºयांना आम्ही थेट नोकरीत घेऊ शकतो. तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यानुसार चौकशी करून निर्णय घेतला जाईल. कुणावर पात्र असताना अन्याय झाला असेल, तर त्याचाही विचार केला जाईल.
- कैलास कणसे, महासंचालक, बार्टी