वरसगावने गाठला तळ
By admin | Published: July 2, 2016 01:46 AM2016-07-02T01:46:51+5:302016-07-02T01:46:51+5:30
खडकवासला धरणातील सर्वाधिक पाणीसाठा क्षमता असलेले दुसऱ्या क्रमांकाच्या वरसगाव धरणानेही तळ गाठला आहे.
पुणे : खडकवासला धरणातील सर्वाधिक पाणीसाठा क्षमता असलेले दुसऱ्या क्रमांकाच्या वरसगाव धरणानेही तळ गाठला आहे. या धरणांमध्ये अवघा ०.०९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून टेमघर धरणापाठोपाठ या धरणातील पाणीही संपले आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १.४६ टीएमसी शिल्ल्क आहे.
खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ही २९.५० टीएमसीची आहे. त्यात सर्वाधिक पाणीसाठा पानशेतचा असून त्या खालोखाल वरसगाव धरणाचा पाणीसाठवण क्षमता साडे दहा टीएमसीची आहे. जून महिना संपत आला असला तरी या चारही धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या धरणामधील पाणीही संपले आहे. त्यामुळे आता केवळ खडकवासला आणि पानशेत धरणांमध्येच पाणी शिल्लक असून खडकवासला धरणामध्ये ०.४७ तर पानशेत धरणामध्ये ०.९७ टीएमसी साठा शिल्लक आहे. (प्रतिनिधी)
>१६७ मिलिमीटर : पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाची हजेरी
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी सहा ते शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६ मिमी, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ मिमी, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
>पाणीसाठ्यात
विशेष वाढ नाही
या शिवाय धरणांच्या लगत असलेल्या नाले, ओढ्यांमधून काही प्रमाणात पाणी येत असले तरी त्यामुळे पाणीसाठ्यात काही विशेष वाढ झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.