बदल्यांना भाजपाच्या बड्या नेत्यांचा आधार

By Admin | Published: June 26, 2016 02:43 AM2016-06-26T02:43:44+5:302016-06-26T02:43:44+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या.

The basis of senior BJP leaders in transfers | बदल्यांना भाजपाच्या बड्या नेत्यांचा आधार

बदल्यांना भाजपाच्या बड्या नेत्यांचा आधार

googlenewsNext

- यदु जोशी,  मुंबई
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या. बदलीच्या कायद्याची राज्यकर्तेच कशी पार मोडतोड करतात याचे ‘उत्तम’ उदाहरण त्यांनी घालून दिले. या नियमबाह्य बदल्यांची शिफारस करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, खा. आनंदराव अडसूळ, आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह काही आमदारांनी कायद्याची ऐशीतैशी करण्यास हातभार लावल्याचे समोर आले आहे.
अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे हे बदलीपात्र नसतानाही आणि त्यांचे कोणतेही निवेदन नसताना फुंडकर यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी एकनाथ खडसे यांना लहाळेंची बदली बुलडाणा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर करण्याची विनंती केली. बुलडाणा येथे या पदावर असलेले विवेक सोनवणे हेही बदलीस अपात्र असताना त्यांना बुलडाण्यातच प्रकल्प संचालक (आत्मा) या पदावर पाठविण्यात आले. त्यानंतर दोनच महिन्यांच्या आत सोनवणेंना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर जळगाव येथे नियमबाह्य पाठविण्यात आले. खा. रक्षा खडसे यांनी सोनावणेंना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून हटवू नये, असे पत्र दिले होते. त्यांच्या पत्रावर, ‘सोनवणेंना एक वर्ष मुदतवाढ द्यावी’ असा शेरा खडसेंनी दिला; पण पुढे सोनवणेंची बदली केली.
सुभाष एस. काटकर हे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे येथे विशेष कार्यकारी अधिकारी होते. ते बदलीला अपात्र असताना आणि त्यांचे कुठलेही निवेदन नव्हते, सार्वत्रिक बदल्यांचा काळही नव्हता तरीही मंत्री गिरीश बापट यांनी त्यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; पुणे या पदावर करण्याची शिफारस केली. त्यावर, विनंतीप्रमाणे बदली करावी, असा शेरा खडसे यांनी दिला.
अधीक्षक पदावर असलेले ज्ञानेश्वर बोटे हेही बदलीस पात्र नव्हते. हे दोघेही बदलीस पात्र नसल्याचा शेरा कृषी विभाग प्रशासनाने दिला. तो डावलून काटकर आणि बोटेंची बदली करण्यात आली. त्यानंतर काहीच दिवसांत बोटे यांची नियमबाह्यरीत्या बदली राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ; पुणेच्या प्रकल्प व्यवस्थापकपदी करण्यात आली. काटकर आणि बोटे अनेक वर्षे मलाईदार पदांवरच राहतात, असा दावा स्वामी विवेकानंद प्रेरित समग्र सुधार मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत कायंदे यांनी राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत केला असून, दोघांच्याही संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उपसंचालक (आत्मा) पुणे या पदावर प्रतापसिंह शंकरराव कदम यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी बदली करण्यात आली. ते त्या पदावर रुजू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ फेब्रुवारी रोजी खडसे यांना पत्र देऊन कदम यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; लातूर या पदावर करण्याची शिफारस केली. विनंतीनुसार बदली करावी, असे लेखी आदेश खडसेंनी दिले आणि ही बदली नियमानुसार नसल्याचा विभागाचा अभिप्राय डावलून कदम यांची लातूरला बदली करण्यात आली. त्याला आपापसातील (म्युच्युअल) बदलीचा मुलामा देण्यात आला. ही बदली कशी नियमबाह्य होती याचा खुलासा राज्यपालांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. (क्रमश:)
खडसेंच्या कारभारावर टीकेची झोड उठवित असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भाजपाचे आमदार जयकुमार रावल, आ. योगेश टिळेकर, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, आ. बाबूराव पाचर्णे यांनी नियमबाह्य बदल्यांच्या शिफारशी केल्या आणि त्यानुसार बदल्याही करण्यात आल्या.

पांडुरंग दिनकरराव शिंगेदार हे प्रकल्प संचालक (आत्मा); ठाणे या पदावर प्रतिनियुक्तीने गेले होते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियुक्ती अधिकारी एक महिन्याची नोटीस देऊन त्यांना परत बोलावू शकतो. मात्र असे काहीही न होता, सार्वत्रिक बदल्यांचा काळ नसतानाही शिंगेदार यांची खोपोली येथे उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची त्यास मान्यताही घेण्यात आली नाही. विभागाच्या वेबसाईटवर हा आदेश टाकण्यात आला नव्हता. काही नियमबाह्य बदल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: The basis of senior BJP leaders in transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.