बस्तवाड ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी
By admin | Published: April 21, 2015 11:46 PM2015-04-21T23:46:31+5:302015-04-22T00:34:09+5:30
तरुणांच्या जिद्दीचे फळ : पेयजल शुद्धिकरणाला लवकरच सुरुवात
रियाज मोकाशी - कोल्हापूर
ज्या समाजात जन्मलो, वाढलो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून तरुणांनी एकत्र येऊन गावातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. बस्तवाड (ता. शिरोळ) येथे बांधलेल्या कृष्णामाई पेयजल शुद्धिकरणाची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या बस्तवाड गावाला कृष्णा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, कृष्णा नदीत वाढलेल्या प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे दिसून आले. गावातील काही ठरावीक नागरिक फिल्टर केलेले बाटलीबंद पाणी पिण्यास बाहेरून आणत होते. मात्र, सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न होता. याच समस्येवर उपाय काढण्यासाठी गावातील काही तरुणांनी प्रयत्न सुरू केले. इर्शाद पाटील, संदीप जंगम, सुनील कोळी, संदीप लाटकर, राहुल कोळी यांसह गावातील तरुणांनी दीड वर्षांपासून यावर विचारविनिमय करून पाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, उत्पन्नाचे साधन अधिक नसल्याने ग्रामपंचायतीला हा प्लांट उभारणे शक्य नव्हते. अखेर २५ जानेवारी २0१५ रोजी गावातीलच जिल्हा परिषदेची १0 बाय १५ इतकी जागा निवडली. या जागेत प्रथम कूपनलिका सुरू करून प्लांटच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यानंतर गाळा बांधकाम, पाण्याची टाकी आणि इतर वस्तूंच्या खरेदीस सुरुवात केली. गावातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, परिसरातील नेते, व्यावसायिक यांच्याकडून देणगी मिळाल्याने आर्थिक बाजू भक्कम होत गेली आणि कामासही वेग आला. एकूण साडेआठ लाखांपर्यंत यासाठी खर्च करण्यात आला आहे. सध्या या प्लांटचे काम पूर्ण झाले असून, लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यानंतर हा प्लांट ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात येईल.
गावसहभागातून उभारलेल्या पेयजलमुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल. यासाठी धडपडणाऱ्या तरुणांचे काम कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीकडूनही याची उत्तम देखभाल करून सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- रावसाहेब कोळी, ग्रामसेवक
दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेऊन केलेले काम निश्चितच चांगले आहे. ग्रामपंचायतीकडूनही पूर्ण सहकार्य राहील.
- शमाबानू जमादार, सरपंच
व्यवसाय सांभाळून समाजकार्य
इर्शाद पाटील हे व्यावसायिक आहेत. संदीप जंगम पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर, सुनील कोळी पुणे येथे इंजिनिअर, तर संदीप लाटकर हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. या तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सांभाळून समाजासाठी हे कार्य केले. तसेच स्वत:चाही आर्थिक वाटा उचलला.
असे मिळणार पाणी
नागरिकांना सुरुवातीला ग्रामपंचायतीकडून १00 रुपयांचे रिचार्ज कार्ड घ्यावे लागेल. त्यानंतर केव्हाही दोन रुपयांस १0 लिटर अशा दराने पाणी घेता येईल. मशीनमध्ये कार्ड दाखवून हवे तेवढे पाणी घेता येईल. मात्र, रिचार्ज संपल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रिचार्ज करून घेता येईल. कार्ड एकदाच खरेदी करावे लागेल.