दर १00 किमीमागे एक प्रसाधनगृह

By Admin | Published: August 16, 2016 01:55 AM2016-08-16T01:55:08+5:302016-08-16T01:55:08+5:30

गणेशोत्सवकाळात कोकणात जाताना वाहतूककोंडी झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरते प्रसाधनगृह उभारण्याचा विचार

A bathroom for every 100km | दर १00 किमीमागे एक प्रसाधनगृह

दर १00 किमीमागे एक प्रसाधनगृह

googlenewsNext

मुंबई : गणेशोत्सवकाळात कोकणात जाताना वाहतूककोंडी झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरते प्रसाधनगृह उभारण्याचा विचार केला जात आहे. दर १00 किलोमीटर मागे एक याप्रमाणे प्रसाधनगृहे देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. यावर अंतिम निर्णय २५ आॅगस्टपर्यंत घेण्यात येईल.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर असणारे खड्डे व महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवकाळात सुरक्षितता व वाहतूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने पर्यायी मार्गाचा विचार परिवहन विभाग व एसटी महामंडळाकडून केला जात आहे. मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बसेस खोपोली, पाली मार्गे माणगाव, महाडमार्गे जातील. तर चिपळूणपुढे रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत जाणाऱ्या एसटी पुणे, सातारा, उंब्रजमार्गे चालविण्याचा विचार परिवहन विभाग व एसटी महामंडळाकडून केला जात आहे. यासाठी २५ आॅगस्टपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. मार्ग क्रमांक ६६ असो वा पर्यायी मार्ग या दोन्ही मार्गांवरून जाताना वाहतूककोंडी झाल्यास प्रवाशांना काही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून आहे. गणेशोत्सवकाळात कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतानाच प्रवासासाठी तासन्तास लागतात. कोकण मार्गावर प्रसाधनगृहे नसल्याने लांबच्या प्रवासात अनेकांची गैरसोय होते. होणारी गैरसोय पाहता दर १00 किलोमीटरमागे एक प्रसाधनगृह उभारण्याचा विचार महामंडळाकडून केला जात आहे. काही लोकप्रतिनिधींनीही तशी मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे. मात्र २५ आॅगस्टपर्यंत महामार्गांवरील खड्डे बुजविण्याचे असलेले उद्दिष्ट आणि वाहतुकीचाही आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

हॉटेलमधील प्रसाधनगृहेही वापरणार
वाहतूककोंडी झाल्यास अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. यातही प्रसाधनगृह नसल्याने महिला व वयोवृद्ध प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळेच कोकण मार्गावर तात्पुरते प्रसाधनगृह उभारण्याचा विचार आहे.
तसे न झाल्यास जवळपास असणाऱ्या एखाद्या हॉटेलमधील प्रसाधनगृहातही प्रवाशांची सोय करण्याचा विचार आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

Web Title: A bathroom for every 100km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.