घरातच बनवली बॅटरीवरील सायकल
By Admin | Published: March 14, 2017 01:44 AM2017-03-14T01:44:59+5:302017-03-14T01:44:59+5:30
जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चिखलोलीतील सुबोध भोईर या मुलाने अशाच कुतूहलापोटी कौशल्य पणाला लावून सर्वांनाच थक्क केले
अंबरनाथ : जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चिखलोलीतील सुबोध भोईर या मुलाने अशाच कुतूहलापोटी कौशल्य पणाला लावून सर्वांनाच थक्क केले. घरातील आपली सायकल बॅटरीवर कशी चालेल, यावर विविध प्रयोग करुन स्वत:च्या सायकलीला बॅटरीवर चालवण्यास सुरूवात केली आहे. एवढयावरच तो थांबला नसून त्याने ही सायकल सोलार पॅनलवर कशी चालेल, याचाही प्रयोग सुरु केला आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरातील प्रसिध्द उद्योजक डी. एम. भोईर यांच्या मुलाने ही किमया केली आहे. आठवीत शिकणाऱ्या सुबोधला वडिलांनी सायकल घेऊन दिली. ती घेतल्यापासुन सुबोध तिला बॅटरीवर कसे चालवता येईल, याचा सतत प्रयत्न करत होता. इलेक्ट्रिकलचे कोणतेही ज्ञान नसतानाही माहिती संकलित करत तो सायकलवर सतत प्रयोग करत राहिला. विजेसोबत खेळण्याचा त्याचा हट्ट घरच्यांमध्ये धास्ती निर्माण करत होता. बॅटरी कशी चार्ज करता येईल याचा प्रयत्न त्याने यशस्वी केला. सायकलचे पॅडल मारुन डिक्कीमधील बॅटरी चार्ज करण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. त्यासाठी त्याने कोणाचीही मदत घेतली नाही, हे विशेष. घरासमोरील वेल्डरकडून सायकलमध्ये काही किरकोळ बदल मात्र करुन घेतले. बॅटरी चार्र्ज करण्यात यश आल्यावर त्याने बॅटरीच्या साह्याने मोटार चालवत सायकल पॅडलशिवाय चालवण्याचा प्रयोग सुरु केला. सायकलमधील बॅटरीच्या साह्याने मोटर सुरु करुन ती गती सायकलच्या चेनला देण्याचा टप्पा त्याने गाठला. नंतर सायकलमध्ये पुन्हा काही बदल करुन मोटारच्या साह्याने सायकलची चेन फिरविणारी यंत्रणा तयार केली. त्यामुळे समान वेगाने सायकल चालवण्यात त्याला यश मिळाले. मात्र चढणीवर आणि कमी वेगानेही सायकल चालविता यावी, यासाठी त्याने पुन्हा काही बदल सुरु केले. मोटारवर रेग्युलेटरची यंत्रणा उभारुन सायकलच्या हँडलला एक्सलेटर बसवत हव्या त्या वेगाने सायकल चालवण्याची यंत्रणा त्याने विकसित केली. त्याचा वापर सायकलमध्ये करुन त्याने एक्सलेटरवर आधारित बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली. आता सायकलची बॅटरी सोलारवर चार्ज करण्याचे त्याचे प्रयत्न सुरु आहेत. (प्रतिनिधी)