पुण्यात धावणार बॅटरीवरील बस
By admin | Published: February 5, 2016 04:01 AM2016-02-05T04:01:37+5:302016-02-05T04:01:37+5:30
मोठ्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ
पुणे : मोठ्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) पाच डिझेल बसेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बदल करून याच बसेस बॅटरीवर चालविल्या जाणार आहेत.
देशभरातील सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस इलेक्ट्रिक करण्यासाठीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हाती घेण्यात आला आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पीएमपीएमएलसह बेस्ट, बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) तसेच तेलंगणा यांच्याही बसेसमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर संसदेच्या आवारात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले होते. याच धर्तीवर मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या संस्थांच्या बसेसही बॅटरी आॅपरेटेड करण्यासाठी ‘कन्वर्जन आॅफ बसेस टू इलेक्ट्रिक कॉन्फिगरेशन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात सुमारे २० बसेसच्या इंजिनमधे बदल करून त्या बॅटरी आॅपरेटेड बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या केपीआयटी आणि सनहिटेक या दोन कंपन्यांनी सादरीकरण केले असून, सीआयआरटीच्या माध्यमातून निविदा मागवून हे काम करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)