प्रशासकीय आखाड्यातही लढाई

By admin | Published: August 28, 2015 01:47 AM2015-08-28T01:47:56+5:302015-08-28T01:47:56+5:30

गेल्या कुंभमेळ्यात महापर्वणीच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. रमणी आयोगाने सर्वाधिक आग्रह धरला होता तो म्हणजे सिंहस्थ

Battle in the administrative arena | प्रशासकीय आखाड्यातही लढाई

प्रशासकीय आखाड्यातही लढाई

Next

- श्याम बागूल,  नाशिक
गेल्या कुंभमेळ्यात महापर्वणीच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. रमणी आयोगाने सर्वाधिक आग्रह धरला होता तो म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सुपुर्द करण्याचे. कारण जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त समकक्ष, तर विभागीय आयुक्त व पोलीस आयुक्त या दोघांचाही दर्जा एकाच रांगेतला. अशा वेळी कोणी कोणाला आदेश द्यायचा व कोणी आदेशाचे पालन करायचे असा श्रेष्ठत्व, ज्येष्ठत्व व कनिष्ठत्वाचा वादच खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याच्या अनियोजनात दडला व त्याची पावलोपावली प्रचिती येत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शासकीय पातळीवर केले जात असून, त्यात सर्वाधिक प्राधान्य जर कोणाला दिले असेल, तर ते कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या साधू-महंतांच्या सरबराईला व त्यांच्या मागेपुढे नाचायला! महिनाभरासाठी मुक्कामी येणाऱ्या साधू-महंतांना वीज, पाणी, स्वच्छता या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन केल्यानंतर ओघानेच कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या वाहतुकीच्या व फक्त स्नानाच्या व्यवस्थेला प्रशासनाने प्राधान्य दिले. म्हणजेच जे काही करायचे होते व आहे ते फक्त आणि फक्त पर्वणीच्या दिवसापुरतेच. तीन पर्वण्यांचे मोजून नऊ दिवसांच्या नियोजनासाठी वर्ष-दोन वर्षे दिवस-रात्र काम करण्याचा आव आणूनही प्रत्यक्ष पर्वणीच्या पूर्वसंध्येपर्यंत नियोजनाचा गोंधळ सुरूच आहे.
अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी केली असती, तर कदाचित स्वत:ला श्रेष्ठ मानून इतरांना कनिष्ठ समजणारे सारेच एका छताखाली बसले असते व त्यांच्यावर उत्तरदायित्वही निश्चित झाले असते.

कुंभमेळ्याचे काउंटडाउन सुरू, शनिवारी प्रथम शाहीस्नान
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला आता अवघे काही तास उरले असून, या भव्य सोहळ्याची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या पर्वणीसाठी नाशिकमध्ये लाखो भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. शहरात गुरुवारी सायंकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यास सुरुवात झाली. शुक्रवार ते रविवारपर्यंत संपूर्ण नाशिक शहर जवळपास ठप्प राहणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी कुंभमेळ्याचे प्रथम शाहीस्नान पार पडणार आहे. सकाळी ६ वाजता नाशिकच्या साधुग्राममधून आखाड्यांची शाही मिरवणूक निघेल. निर्वाणी, दिगंबर व निर्मोही या क्रमानुसार निघणाऱ्या तिन्ही आखाड्यांच्या मिरवणुकांमध्ये २०० मीटरचे अंतर असेल. सकाळी ११पर्यंत शाहीस्नान आटोपेल, असा अंदाज आहे. सामान्य भाविकांना रामकुंडावर दुपारी २नंतर प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय शहर परिसरातील घाटांवर स्नानाची सोय करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे ३.३५पासून कुशावर्तात शाहीस्नानाला प्रारंभ होईल. दुपारी २नंतर सामान्य भाविकांना स्नानासाठी प्रवेश मिळेल. याशिवाय शहरात चार अन्य घाटांची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Battle in the administrative arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.