महाराष्ट्राच्या सीमेवर इंधनदराचे युद्ध

By admin | Published: October 12, 2015 05:28 AM2015-10-12T05:28:13+5:302015-10-12T05:28:13+5:30

पेट्रोल, डिझेलवरील स्थानिक व दुष्काळ करामुळे राज्यात इंधन महागले आहे. त्यामुळे आसपासची सात राज्ये आणि महाराष्ट्रातील इंधन दरात कमालीची तफावत आहे

Battle of the Battle of Maharashtra on the border | महाराष्ट्राच्या सीमेवर इंधनदराचे युद्ध

महाराष्ट्राच्या सीमेवर इंधनदराचे युद्ध

Next

मिरज : पेट्रोल, डिझेलवरील स्थानिक व दुष्काळ करामुळे राज्यात इंधन महागले आहे. त्यामुळे आसपासची सात राज्ये आणि महाराष्ट्रातील इंधन दरात कमालीची तफावत आहे. त्यातच सीमेपलिकडील कर्नाटकच्या पेट्रोलपंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त’ असे फलक लावण्यात आले आहेत. राज्यातील वाहनचालक इंधनासाठी शेजारील राज्यात जाण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा फटका सीमा भागातील पेट्रोलपंपाना बसत आहे.
राज्यात १ आॅक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करून डिझेलवर प्रति लिटर दोन रुपये दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विविध स्थानिक करांमुळे लगतच्या कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगण, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सरासरी ३.५० रुपये प्रति लिटर जादा दर आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात मुंबई विकास कर (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) म्हणून प्रति लिटर तीन रुपये आकारणी होते.
नागपूर, औरंगाबाद, नंदुरबार, ठाणे, अमरावती, बारामती या शहरांत रस्ते विकासासाठी प्रति लिटर १ ते ४ रुपये जादा व्हॅट आकारणी होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर या शहरात लष्करी छावणी असल्याने येथे इंधनावर एलबीटी व जकात वसुली अद्याप सुरू आहे. त्यातच या महिन्यापासून डिझेलवर दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आल्याने, शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी डिझेल विक्रीत घट होऊन हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती राज्यातील पेट्रोल पंप चालकांना आहे.
अर्थमंत्र्यांना उद्या भेटणार
महाराष्ट्राच्या तुलनेत डिझेल गोव्यात प्रति लिटर ५.५० रुपये, गुजरातमध्ये ३.६२, कर्नाटकात ३.५२, छत्तीसगडमध्ये ३.५३, आंध्रमध्ये १.८१ रुपयांनी स्वस्त आहे. पेट्रोल सरासरी २ ते ३ रुपये स्वस्त आहे. त्यामुळे इंधन विक्री व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे. कर रद्द करण्याच्या मागणीबाबत मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पेट्रोल पंपचालकांची बैठक होणार आहे.

Web Title: Battle of the Battle of Maharashtra on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.