भाजपा-सेनेची ही लढाई लुटूपुटूची !
By admin | Published: February 12, 2017 05:50 AM2017-02-12T05:50:43+5:302017-02-12T05:50:43+5:30
भाजपा आणि शिवसेनेची लुटूपुटूची भांडणे सुरू आहेत. माध्यमांचे सगळे लक्ष त्या भांडणाकडेच असल्याने विकासाचा अजेंडाच बाजूला गेला आहे. सत्तेतील या दोन्ही पक्षांना नेमके हेच हवे होते.
- अतुल कुलकर्णी, मुंबई
भाजपा आणि शिवसेनेची लुटूपुटूची भांडणे सुरू आहेत. माध्यमांचे सगळे लक्ष त्या भांडणाकडेच असल्याने विकासाचा अजेंडाच बाजूला गेला आहे. सत्तेतील या दोन्ही पक्षांना नेमके हेच हवे होते. परिणामी मुंबईत २० वर्षे आणि राज्यात गेली दोन अडीच वर्षे सत्ता भोगणाऱ्या भाजपा- शिवसेनेने नेमका विकास केला तरी काय? हे प्रश्नच चर्चेतून बाजूला फेकले गेल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
लोकमतशी बोलताना त्यांनी राज्यातील भाजपा सरकारच्या दुटप्पी वागण्यावर सडकून टीका केली. पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, औषध खरेदी घोटाळा, तूरदाळीचा घोटाळा, विनोद
तावडे यांचा वॉटर प्यूरीफायर खरेदीचा घोटाळा, पदवीचा घोटाळा हे सारे या मंत्र्यांनी केले आहे. महसूलमंत्री
एकनाथ खडसे यांना राजकीय सोय
म्हणून बाजूला केले गेले, पण अन्य मंत्र्यांना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली आहे. हे कोणतेही विषय चर्चेत नको असल्याने दोघांनी आपापसातील भांडण सुरू केले आहे. ही जनतेच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक असल्याचेही ते म्हणाले.
आपण काही ठिकाणी राष्ट्रवादीशी तर काही ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेशी लढत देत आहात. या तिघांपैकी नेमका शत्रू कोण आहे?
आमचा शत्रू फक्त भाजपा आहे. त्यांचे जातीयवादी राजकारण आणि संघांची मानसिकता यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बनवलेल्या देशाच्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झाला आहे. अल्पसंख्यांकांना डिवचण्याचा त्यांचा डाव आहे. देशात राष्ट्रपती पद्धतीचा कारभार आणावा याकडे वाटचाल सुरू आहे. धर्माधारित व्यवस्था उभी करण्याचे त्यांचे प्रयत्न अल्पसंख्यांकांना अडचणीत आणणारे आहेत. त्यामुळेच भाजपाचा पराभव हेच आमचे ध्येय्य आहे.
उद्या भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची वेळ आली तर?
शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आणि त्याला दोन्ही काँग्रेसने थेट किंवा अप्रत्यक्ष सत्तेत पाठिंबा द्यायचा, अशी चर्चा सुरू असली तरी काँग्रेसचे श्रेष्ठी याला मान्यता देतील की नाही मला माहिती नाही. राष्ट्रवादीची भूमिका यात संशयास्पद होती. ते आयत्या वेळी काय करतील हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादीने भाजपासोबत जायचे नाही असे जाहीर केले आहे. शिवसेना भाजपात भांडणे लावण्यासाठी त्यांनी त्यावेळी ती भूमिका घेतल्याचे अजित पवार म्हणाले.
तसे असेल तर चांगलेच आहे. आता सेना-भाजपात भांडणे लागली आहेत, तेव्हा त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हरकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही हे स्पष्ट झाले तरच भाजपाला अडचणीत आणायला शिवसेना वेळ वाया घालवणार नाही.
या भांडणांचा फायदा मुंबईत दोन्ही काँग्रेसने आघाडी केली असती तर झाला नसता का?
फायदा झाला असता की नसता याहीपेक्षा मुंबईत दोन्ही काँग्रेसने आघाडी केली, हा संदेश गेला असता तर त्याचे राज्यात चांगले चित्र उमटले असते. दुर्देवाने मुंबईत आघाडी होऊ शकली नाही. आपापसातील मतभेद आमच्या जबाबदार नेत्यांनीही सोडवायला हवे होते. आमच्या मुंबईतच्या काही नेत्यांनीही हट्ट सोडायला हवा होता. पण ते झाले नाही. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत आघाडी करायला लावली होती. फायद्यापेक्षा त्यातून संदेश जाणे महत्त्वाचे होते.
भाजपाने गुंडांना प्रवेश दिलाय. अन्य पक्षातील गुंडगिरी करणारे त्यांच्याकडे गेले..?
आज संयमाने राजकारण करण्याची संस्कृती राहिलेली नाही. सत्ताधारी भाजपाने पक्ष बळकट करण्यासाठी वाट्टेल ते करणे सुरू केले आहे. स्वत:च्या सत्तेसाठी गुंडांना प्रवेश देणे हे संघाच्या संस्कृती वाढलेल्या अनेकांना मान्य नाही. भाजपाची ही भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आणि राजकारणासाठी दु:खद आणि खेदाची बाब आहे.
सत्तेत राहणार नाही, असे शिवसेना म्हणत आहे. निवडणुकीनंतर शिवसेना बाहेर पडली तर...?
पडली तर काय, याला अर्थ नाही. मुळात शिवसेनेने सत्तेत राहून सगळे फायदे घेणे चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी आधी काय ते स्पष्ट करायला हवे. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न सोडवता येईल.
राज्यात तरी
कुठे सगळीकडे दोन्ही काँग्रेसची आघाडी झालीय?
ज्या ठिकाणी दोन्ही काँग्रेसमध्येच थेट स्पर्धा आहे, तेथे अडचण आहे. पण अनेक ठिकाणी आम्ही आघाडी केली आहे. आज भाजपाच्या पराभवासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही सत्तेत असताना सेना- भाजपाचे आव्हान नव्हते. यावेळी भाजपाच्या चंचुप्रवेशाने ते निर्माण झाले.
अजित पवार व माझ्यात मतभेद नव्हतेच, गैरसमजही झाले दूर !
आमच्यात मतभेद नाहीत आणि नव्हते. पण काही गैरसमज झाले होते. मी माझ्या परिने ते दूर करण्याचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना कोणतेही निर्णय राजकीय परिप्रेक्षातून घेतले नाहीत. काय घडले ते सगळ्यांना माहीत आहे. ते पुन्हा बोलण्यात अर्थ नाही. पण माझ्या मनात आज कोणतेही गैरसमज नाहीत. भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे एवढेच मी सांगेन.