सत्य समोर आणण्याकरिता लढाई - राहुल गांधी
By admin | Published: January 31, 2017 02:25 AM2017-01-31T02:25:51+5:302017-01-31T02:25:51+5:30
‘आपली लढाई ही सत्याची लढाई असून सत्य जगासमोर आले पाहिजे, याकरिता माझ्या विरोधातील खटला ठामपणे लढवत आहे. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हा मी कोर्टात
भिवंडी : ‘आपली लढाई ही सत्याची लढाई असून सत्य जगासमोर आले पाहिजे, याकरिता माझ्या विरोधातील खटला ठामपणे लढवत आहे. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हा मी कोर्टात हजेरी लावणार आहे’, असे उद्गार काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी पत्रकारांकडे काढले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता तालुक्यातील सोनाळे गावातील मैदानात राहुल गांधी यांची सभा झाली होती. त्या वेळी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याकरिता भिवंडी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात त्यांच्याविरोधात दावा सुरू असून सुनावणीकरिता गांधी न्यायालयात आले होते. सकाळी साडेदहा वाजता गांधी न्यायालयात येणार म्हणून शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता गर्दी केली होती. कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साहाचे वातावरण होते. परंतु, दिल्लीमध्ये दाट धुके असल्याने त्यांचे विमान ठरलेल्या वेळी उडू शकले नाही. भिवंडीतील न्यायालयात १२.५० वाजता राहुल यांचे आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्यांच्यासोबत होते. राहुल यांची भेट घेण्याकरिता, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याकरिता कार्यकर्ते उत्सुक होते. राहुल यांनी हात उंचावून त्यांना अभिवादन केले.
भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश तुषार वाजे यांच्या कोर्टात अन्य एका खटल्यातील निकालपत्राचे वाचन सुरू असल्याने राहुल गांधी आपल्या समर्थकांसह कोर्टाबाहेर उभे होते. गांधी यांच्यावर सोमवारी आरोपनिश्चिती होणार होती. परंतु, फिर्यादी पक्षाने आपल्या दाव्यासोबत वृत्तवाहिनीची सीडी व तीन वर्तमानपत्रांतील बातम्यांची कात्रणे जोडली आहेत.
वर्तमानपत्रांची स्थळप्रत त्यांनी न दिल्याचा युक्तिवाद गांधी यांच्या वकिलांनी केला. त्यामुळे कोर्टाने फिर्यादीस दाव्यासोबत जोडलेल्या कात्रणांच्या तीन वर्तमानपत्रांच्या स्थळप्रती देण्याचे आदेश दिले. तसेच ३ मार्च २०१७ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे, अशी माहिती गांधी यांचे स्थानिक वकील नारायण अय्यर यांनी दिली. या वेळी त्यांच्यासोबत ख्यातनाम विधिज्ञ अशोक मुंदरगी व दिल्लीच्या तरन्नुम चिम्मा उपस्थित होत्या.
फिर्यादी राजेश कुंटे यांच्या वतीने पुण्याचे वकील नंदू फडके यांनी बाजू मांडली.
या वेळी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, भाई जगताप, आरीफ नसीम खान, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रशीद ताहीर व मोहम्मद अली खान आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)