शिंदे-परांजपेंमध्ये गुरुशिष्याची लढाई
By admin | Published: June 25, 2016 01:37 AM2016-06-25T01:37:36+5:302016-06-25T01:37:36+5:30
शहराध्यक्षपदासाठी आपल्याच मर्जीतील नेत्याची वर्णी लागावी, म्हणून जंगजंग पछाडणाऱ्या नेत्यांना धोबीपछाड देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आनंद परांजपे यांची नियुक्ती करून ‘जोर का झटका’ दिला आ
अजित मांडके, ठाणे
शहराध्यक्षपदासाठी आपल्याच मर्जीतील नेत्याची वर्णी लागावी, म्हणून जंगजंग पछाडणाऱ्या नेत्यांना धोबीपछाड देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आनंद परांजपे यांची नियुक्ती करून ‘जोर का झटका’ दिला आहे. वरवर जरी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत झाले असले तरी उमेदवारी देताना ही धुसफूस बाहेर पडेल, अशी चिन्हे आहेत. त्याच वेळी माजी शिवसैनिक असलेल्या परांजपे यांना रिंगणात उतरवल्याने एकनाथ शिंदे-परांजपे अशी गुरुशिष्याची लढाई ठाणेकरांना पाहायला मिळेल.
ठाणे पालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्यात वेगळे लढण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना-भाजपामधील वाद रंगू लागले आहेत. त्याच गर्दीत काँग्रेसने रिक्त असलेले शहराध्यक्षपद ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याकडे सर्व सूत्रे सोपवत निवडणुकीच्या तयारीत रंग भरले आहेत.
त्याच वातावरणात परांजपे यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचे स्पष्ट संकेत देत पवार यांनी परमारप्रकरणी राष्ट्रवादीवर होणारी चिखलफेक थांबवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याच वेळी पांढरपेशा, सुसंस्कृत उमेदवार देत भाजपाच्या ब्राह्मणी मतपेटीलाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद पाऊण वर्ष रिक्त होते. त्यावर, आपल्याच मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती व्हावी, यासाठी वेगवेगळे गट गळ टाकून बसले होते. ज्येष्ठ नेते अशोक राऊळ, देवराम भोईर, निरंजन डावखरे, सुहास देसाई यांची नावे त्यासाठी पुढे सरकवली जात होती. त्यांच्यापैकीच कोणाच्या तरी गळ्यात ही माळ पडेल, हे निश्चित मानले जात होते. परंतु, पक्षाने या सर्वांना बाजूला सारत दोन वर्षांपूर्वी पक्षात डेरेदाखल झालेले आनंद परांजपे यांच्या गळ्यात पदाची माळ घातली आहे. परांजपे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. परमार प्रकरणात वरपासून अनेक नेत्यांवर बरबटल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा येत्या निवडणुकीत होऊ शकतो, असाच अर्थ यानंतर काढला जात आहे. शिवाय, त्यांच्यावर कोणत्याही गटाचा शिक्का नाही, हीदेखील जमेची बाजू आहे.
परांजपे यांच्या निवडीचे पहिल्या दिवशी सर्व गटातटांनी स्वागत केले असले, तरी नंतर मात्र नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. पक्षात इतर ज्येष्ठ आणि आक्रमक नेते असतानाही दोन वर्षांपूर्वी पक्षात दाखल झालेल्यांवर नेतृत्वाचा एवढा विश्वास कशासाठी, अशी कडवट टीकाही स्पर्धकांनी केली आहे. यामुळे जी गटबाजी उफाळून येईल, पक्ष नेमस्त-मवाळ होईल आणि ते सेनेच्या पथ्यावर पडेल, असाही सूर लावला जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील ही खदखद पवार यांच्या कानी घालण्यास कोणीही तयार नाही.
फायदा गुरूचा की शिष्याचा?; परस्परांच्या ताकदीची पूर्ण कल्पना
निवडीनंतर आनंद परांजपे यांचा सामना थेट त्यांचे पूर्वीचे गुरू समजले जाणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे. त्यांच्या कामाची पद्धत ठाऊक असल्याचा फायदा परांजपे यांना होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी परांजपे यांच्या क्षमतांची शिंदे यांनाही जाण आहे. त्यामुळे हा सामना नेमका कसा होईल, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद पणाला लागेल का, हेच महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणावर एकनाथ शिंदे यांचे आजही एकहाती वजन आहे. लोकसभा-विधानसभा निवडणूक, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक, नवी मुंबईचे स्थायी समिती सभापतीपद आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांना धूळ चारून त्यांनी ते दाखवूनही दिले आहे. ठाणे शहराचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांचे उत्तम संघटनकौशल्य वादातीत आहे. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, तर ती तडीस जाईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. निवडणुकीपूर्वी जरी पक्षात गटातटांचे राजकारण असले, तरी ऐन निवडणुकीत सर्वांना सोबत नेण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यांच्याच मुशीतून तयार झालेले परांजपे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले आहेत. त्यांना या सर्वांचा विचार करावा लागेल. पक्षातील आक्रमक नाराज नेत्यांना सांभाळावे लागेल. स्वच्छ प्रतिमा हाच त्यांचा प्लस पॉइंट असला, तरी पक्षाची विसविशित संघटना, परिसरानुसार निर्माण झालेले गट यांचाच सामना त्यांना सर्वात आधी करावा लागणार आहे.
लेले विरुद्ध परांजपे : भाजपाच्या पांढरपेशा मतदारांना धक्का देण्यासाठी खासकरून जुन्या ठाण्याच्या वस्त्यांतील मतदारांना प्रभावित करण्यासाठी परांजपे यांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीनेही ही लढाई लेले विरुद्ध परांजपे अशी होऊ शकते. राष्ट्रवादीतील निवडून येऊ शकणाऱ्या काही नेत्यांसाठी गळ टाकलेल्यांचीही आता घालमेल होण्याची शक्यता वर्तवली जाते.
देसाई यांचा हिरमोड : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज होते. राबोडीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांचे नाव निश्चित झाल्याचा फोन गुुरुवारी दुपारी त्यांच्या नेत्याने त्यांना केला. त्यानंतर, काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना घरी जाऊन शुभेच्छाही दिल्या. आपले नाव नक्की झाल्याचे आपल्याच नेत्याकडून कळताच त्यांनी खास पोशाख तयार केला. तसेच पेढे वाटण्याची तयारीही केली होती. परंतु, अवघ्या अर्ध्या तासातच त्यांचा पत्ता कापून परांजपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने देसाई यांचा हिरमोड झाला.
कौतुक की धक्का?
परांजपे यांच्याकडे सध्या पक्षाच्या सोशल मीडियाची जबाबदारी होती. कल्याणची खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर महत्त्वाच्या प्रसंगात मोठी जबाबदारी दिल्याचे मानणारा एक गट आहे, तर त्यांना मोठ्या पदावरून शहर पातळीवर आणून त्यांना कमी महत्त्वाचे पद दिल्याची भावनाही काहींनी व्यक्त केली आहे.
या पदामुळे त्यांचा पुढील खासदारकीचा दावा कमकवुत झाल्याचे मानले जाते किंवा ठाण्यात काम करून ठाणे लोकसभेसह तेथील चार विधानसभा मतदारसंघांचा त्यांचा अभ्यास पक्का होईल, असाही दावा केला जातो. अशा बिकट परिस्थितीत पक्षाची धुरा सांभाळून काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी पक्षाची ढासळलेली स्थिती सावरली तरी त्यांचे राजकीय वजन वाढू शकते.