काटोलमध्ये काका-पुतण्याची लढाई
By admin | Published: September 28, 2014 01:06 AM2014-09-28T01:06:36+5:302014-09-28T01:06:36+5:30
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष व अमोल यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपच्या
अनिल देशमुखांविरुद्ध आशिष देशमुख उतरले
नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष व अमोल यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपच्या उमेदवारीवर आपले काका अनिल देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले तर डॉ. अमोल देशमुख हे काँग्रेसचा हात सोडत रामटेकमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार झाले आहेत. या राजकीय घटनाक्रमामुळे पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात दरी वाढली आहे.
अनिल देशमुख यांना काटोल विधानसभेचा दांडगा अनुभव आहे. २० वर्षांपासून काटोलच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. आजवर त्यांना बाहेरच्या विरोधकांना सामोरे जावे लागले. आता मात्र त्यांचे पुतणे आशिष देशमुख हेच भाजपकडून त्यांच्या विरोधात उतरले आहेत. गेल्यावेळी सावनेरमध्ये भाजपकडून लढलेले आशिष देशमुख यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. यावेळी पुन्हा त्यांनी सावनेरवर दावा केला. मात्र, पक्षाने त्यांना नकार देत त्यांना काटोलचा प्रस्ताव दिला. त्यांनी तो स्वीकारलाही. रात्री उशिरा ‘वाड्यावर’ बैठकीनंतर आशिष देशमुख यांचे नाव भाजपकडून काटोलसाठी निश्चित झाले. ही माहिती अनिल देशमुख यांना मिळाली.