ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे निसर्ग विरोधातील...: डॉ. मोहन आगाशे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:28 PM2020-04-28T17:28:40+5:302020-04-28T17:28:56+5:30

सद्यस्थितीत 'कोरोना' ला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे..

This battle is not against corona but against nature .....: Dr. Mohan Agashe | ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे निसर्ग विरोधातील...: डॉ. मोहन आगाशे

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे निसर्ग विरोधातील...: डॉ. मोहन आगाशे

googlenewsNext
ठळक मुद्देज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांची कोरोनाविषयीची वैचारिक, चिंतनशील मांडणी..

नम्रता फडणीस-
    पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आपल्याला निरनिराळ्या प्रकारे संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. भूकंप, त्सुनामी,महापूर येत आहे. पावसाचं चक्र उलटसुलट झालं आहे. पण आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. अखेर निसर्गाने त्याचा मार्ग शोधला आहे. आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत. आपण त्याचाच एक भाग आहोत हे विसरलो आहोत. त्यामुळे ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गविरोधातील आहे, अशा वैचारिक, चिंतनशील मांडणीतून ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी ' मानवाला सूचित केले आहे.
     सद्यस्थितीत 'कोरोना' ला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे.  रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वॉरियर्स जीवाचे रान करीत आहेत. पण ही लढाई आत्ताची नाही असे डॉ. मोहन आगाशे यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.
   ते म्हणाले, वर्तमान जगताना भूत आणि भविष्याचा संदर्भ असावा लागतो. जसं एखाद्या चित्राला पार्श्वभूमी असल्याशिवाय ते उठून दिसत नाही. तशीच माणसाच्या आयुष्याला पार्श्वभूमी लागते. जे काही घडले आणि घडणार आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण आणि निसर्ग वेगळे नाही. आपण एकच आहोत. पण निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे. आपण त्याचाच एक भाग आहोत. आपण जिथे आहोत तिथून जग सुरू होते असा विचार जेव्हा सुरू झाला. तेव्हा खरी पंचाईत झाली. पूर्वी वैद्यकशास्त्रात रुग्ण आला की माणूस बघायचे, आजार बघायचे नाहीत, माणसा प्रमाणे औषध दिले जायचे. पण आज आधी आजार बघून मग मनुष्याला औषध दिले जात आहे.आपला व्यवसाय हा कधी धंदा झाला हे कळले देखील नाही. पण पैशाने मिळणाऱ्या  गोष्टी या निव्वळ भौतिक आहेत. ही सगळी एक निसर्गलॉजी आहे.
    निसर्ग म्हणजे एकमेकांशी असलेलं नात आहे. सजीव, निर्जीव ची एक समज उमज असावी लागते. मात्र आज बुद्धीची वाढ संवेदनापेक्षा जलद गतीने झाली आहे. नात टिकविण्यासाठी बुद्धी नि संवेदना दोन्हींची गरज लागते. मग ते नात निसर्गाच का असेना? निसर्गाचा एक घटक हा ' माणूस' आहे. पण माणसाच्या बुद्धीचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत आहे.  ' प्रगती' या  नावाखाली माणूस म्हणून एक वेगळंच रूप धारण केलं आहे.आपण निसर्गाच्या विरोधात जात आहोत.
    आपण आपल्या हाताने निसर्गाचे संतुलन बिघडवलं आहे. त्यामुळे आज मानवजातच त्याला बळी पडते आहे. पण निसर्ग आपल्यालाही आपलंच मानतो. तो फक्त त्याचं बिघडलेलं तंत्र दुरुस्त करतो आहे. तो आपल्याला सांगू बघतो आहे की मायक्रोस्कोपखालीही सहज न दिसू शकणार हा व्हायरस तुला नष्ट करू शकतो. तर  थोडासा नतमस्तक हो. तू माझाच भाग आहेस हे मी विसरलो नाहीये, तू ही विसरू नकोस. याकडे लक्ष वेधण्याचा डॉ आगाशे यांनी प्रयत्न केला आहे.
.........
आपण लोकांचं आयुर्मान वाढवतोय
     आपण मेडिकल सायन्स, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याचा आधारे माणसाचं आयुर्मान वाढवत आहोत. शरीराचे अवयव हे प्रत्यारोपित करत आहोत आणि निसर्गाचे संतुलन बिघडवत आहोत. नैसर्गिकरित्या जन्म- मृत्यू होऊच देत नाहीयोत. जन्म-मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्ग कायम आपलं संतुलन जपण्याच्या प्रयत्नात असतो. एक विषाणू आपण नष्ट केला तर तोच रूप बदलून पुन्हा येतो. आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत असे डॉ आगाशे यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.
......

Web Title: This battle is not against corona but against nature .....: Dr. Mohan Agashe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.