शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी पैनगंगेवर उभारलेल्या बॅरेजेसमधून शहराला पाणी; शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:15 PM2018-02-21T14:15:44+5:302018-02-21T14:20:29+5:30
शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि बारमाही पिके घेणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत.
वाशिम : जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी परिसरातील ११ गावच्या ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. साखळी उपोषण , आमरण उपोषण, जलसमाधी उपोषणाच्या माध्यमातून या निर्णयाचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चाला जवळपास ५ हजार शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि बारमाही पिके घेणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा न करता या बॅरेजेसमधून परस्पर शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय अन्यायकारक असून वाशिमला पाणी देऊ नये, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत प्रशासन न्याय देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.