भाजपाच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांत होणार लढाई
By admin | Published: July 23, 2016 02:00 AM2016-07-23T02:00:11+5:302016-07-23T02:00:11+5:30
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या भांगरवाडी विभागाची प्रभागरचनेत तीन ठिकाणी फाळणी झाली
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या भांगरवाडी विभागाची प्रभागरचनेत तीन ठिकाणी फाळणी झाली असली, तरी भांगरवाडीचा होम वॉर्ड असलेल्या प्रभाग क्र. ५ मध्ये एक जागा सर्वसाधारणसाठी खुली राहिली आहे. त्यामुळे या जागेसाठी निवडणूक लढविण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह मागील काळात अपयशी ठरलेले, तसेच नव्याने या रिंगणात उतरणाऱ्यांनी शड्डू ठोकल्याने पक्षनेत्यांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.
भांगरवाडी प्रभागात मागील पंचवार्षिक निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना पराभूत करत भाजपामधल्याच काही मातबरांनी नव्याने तयार केलेल्या लोणावळा शहर विकास आघाडीने बाजी मारत चारही जागा जिंकल्या होत्या.
या वर्षीदेखील ही आघाडी कायम राहिल्यास ती राजकीय पक्ष विशेषत: भाजपाला डोकेदुखी ठरणार आहे. नवीन प्रभागरचनेनुसार हा प्रभाग नगरसेवक विजय मोरे व सुरेखा जाधव यांना सोयीस्कर ठरणार आहे. श्रीधर पुजारी यांनीदेखील या प्रभागात केलेली विकासकामे त्यांचे बेरजेचे राजकारण ठरणार आहे.
भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानचा ओव्हरब्रिज, रेल्वे गेटजवळील रस्त्याचे रुंदीकरण, वाढती वाहतूककोंडी, हनुमान टेकडीच्या कडेने प्रस्तावित असलेला रिंग रोड, सोसायट्यांचे प्रश्न आदी महत्त्वाच्या विषयांना या निवडणुकीत प्राधान्यक्रमाने घ्यावे लागणार आहे. या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी नगरसेवक मोरे, दत्तात्रय येवले, श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव, मारुती तिकोणे, देविदास कडू, मनोज लऊळकर, अपर्णा बुटाला, योगिता कोकरे, अश्विनी जगदाळे, बाबा शेट्टी, ऋषीकेश लेंडघर, महेश खराडे, दीपक विकारी, विनय विद्वांस, गणेश साबळे, अनिल कालेकर, बाळासाहेब फाटक आदी इच्छुक आहेत. यातील बहुतांश इच्छुक भाजपाचे असल्याने भाजपाच्या बालेकिल्ल्यातून कोणाला संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
>प्रभाग रचना : नवीन रचनेनुसार या प्रभागात उत्तरेकडून लोहगड उद्यान ते रेल्वे कॅबिनपर्यंतचा रस्ता ते प्रस्तावित ओव्हरब्रिजपर्यतचा रस्ता. पूर्वेकडे प्रस्तावित ओव्हरब्रिज ते गोळपकर घर ते वावळे घर ते शेलार घरापर्यंतचा डीपी रस्ता. दक्षिणेकडे शेलार घर ते कृष्णा छाया अपार्टमेंट ते भोंडे शाळेपर्यंतचा डीपी रोड. पश्चिमेकडील भोंडे शाळा ते सार्वजनिक शौचालय ते अॅड. नागेश घर ते पांचाळ घर ते महालक्ष्मी मंदिर ते लक्ष्मी नारायण इमारत जे लोहगड उद्यानपर्यंतचा रस्ता.