बॅ. अंतुले यांच्यावर अंत्यसंस्कार
By Admin | Published: December 4, 2014 02:52 AM2014-12-04T02:52:20+5:302014-12-04T02:52:20+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता आंबेत (तालुका म्हसळा) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
म्हसळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता आंबेत (तालुका म्हसळा) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी मुंबईहून आंबेतला नेण्यात आले होते. या
वेळी हजारोंच्या समुदायाने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. संपूर्ण शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यविधीच्या वेळी २० पोलिसांच्या तुकडीने
त्यांना तीन फैरींची सलामी
दिली.
बॅ. अंतुले यांच्या अंत्यदर्शनासाठी केवळ कोकणातूनच नव्हे तर देशातील विविध राज्यांतून त्यांचे चाहते आंबेतमध्ये दाखल झाले होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व माजी केंद्रीय मंत्री आॅस्कर फर्नांडिस, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विलासकाका उंडाळकर, नारायण राणे, आमदार पंडितशेठ पाटील, आ. अवधूत तटकरे, आ. भरतशेठ गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत, माजी आमदार मीनाक्षी पाटील, माणिक जगताप, कृपाशंकर सिंह आदींनी अंतुले यांना श्रद्धांजली वाहिली. शोकसभेत अनेकांनी अंतुले यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले. (विशेष प्रतिनिधी)