एमपीएससीचे माजी अध्यक्ष बी.बी. शिंदे यांचे निधन
By Admin | Published: September 4, 2016 10:27 PM2016-09-04T22:27:25+5:302016-09-04T22:27:25+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भिकन बापूराव ऊर्फ बी.बी. शिंदे (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 4 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भिकन बापूराव ऊर्फ बी.बी. शिंदे (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बोरगाव सारवनी (ता. सिल्लोड) या मूळ गावी सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तसेच बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे प्रदीर्घ काळ प्राचार्य राहिलेले बी.बी. शिंदे हे गणिताचे रँगलर म्हणून ओळखले जात. कडक शिस्तीचे म्हणून ख्याती असणाऱ्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी गणित या विषयातह्यपी.एचडी. मिळविली. गेवराई येथील अट्टल महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी १९७०-७१ या वर्षी काम बघितले. त्यानंतर १९७१ ते १९७९ या कालावधीत त्यांनी बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले.
१९९० ते २००२ या १२ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एमपीएससीचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी ६ वर्षे एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र शासनाच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे त्यांनी १२ वर्षे सदस्यत्व भूषविले. यापैकी ६ वर्षे ते राज्यपाल नियुक्त सदस्य होते.