बीडीडी चाळ गैरव्यवहाराची चौकशी
By Admin | Published: July 31, 2015 02:38 AM2015-07-31T02:38:49+5:302015-07-31T02:38:49+5:30
मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळींच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत गैरव्यवहार झाला आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा
मुंबई : मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळींच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत गैरव्यवहार झाला आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
बीडीडी चाळींच्या देखभाल- दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत झालेल्या गैरव्यवहाराचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुनिल शिंदे, नसीम खान, कालिदास कोळंबकर, गणपतराव देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. यावर बोलताना बांधकाम मंत्री म्हणाले, सदर विषयाबाबत मुख्य अभियंत्यांना सविस्तर चौकशी करुन अहवाल शासनास सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.
चौकशी अहवाल येत्या एक महिन्यात तयार करण्यात येईल. तसेच या अहवालानुसार संबंधित अधिकारी / ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात निधीची तरतुद केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेबाबत चौकशी अहवाल सादर
जळगाव येथील जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी अहवाल सादर केला असल्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भूसे यांनी आज विधानसभेत सांगितले. आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना भूसे म्हणाले, जळगावच्या सहकारी संस्थेस या संदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. १ एप्रिल २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने चौकशी अधिकारी यांनी १६ जुलै रोजी अहवाल सादर केल्याचे ते म्हणाले.