बीडीडी चाळींच्या पूनर्विकासाचा मार्ग मोकळा, 22 एप्रिलला भूमिपूजन
By admin | Published: April 20, 2017 09:01 AM2017-04-20T09:01:21+5:302017-04-20T09:01:21+5:30
मागच्या अनेकवर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळींच्या पूनर्विकासाचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- मागच्या अनेकवर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळींच्या पूनर्विकासाचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. येत्या 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नायगाव येथे बीडीडी चाळींच्या पूनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. नायगाव, वरळी, डिलाईल रोड आणि शिवडी परिसरात एकूण 207 बीडीडी चाळी असून, पहिल्या टप्प्यात नायगाव, वरळी, डिलाईल रोड येथील 194 बीडीडी चाळींचा पूनर्विकास होईल.
शिवडी परिसरातील बीडीडी चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत उभ्या असल्याने या चाळींबाबत नंतर निर्णय होईल. पण या चाळींच्या पूनर्विकासाचाही प्रक्रिया सुरु आहे. 95 वर्ष जुन्या ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या या बीडीडी चाळी जीर्ण झाल्या आहेत. काही चाळींची तात्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. बीडीडी चाळींच्या पूनर्विकासावर गेली अनेकवर्ष फक्त चर्चा आणि घोषणा सुरु होत्या. देवेंद्र फडणवीस सरकारने या चाळीच्या पूनर्विकासाचा प्रकल्प अखेर मार्गी लावला.
डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पूनर्विकासाचे काम शापूरजी अँड पालनजी कंपनीकडे तर, नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पूनर्विकासाचे काम एल अॅन्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. वरळीसाठी लवकरच नव्या विकासकाची घोषणा केली जाईल. बीडीडीमध्ये सध्या 160 ते 180 चौरस फूटांची घरे असून, पूनर्विकासामध्ये बीडीडीमधील चाळक-यांना 500 फूटांची मोफत सदनिका मिळणार आहे.