पोहणे ठरले जीवघेणे
By admin | Published: May 4, 2017 04:18 AM2017-05-04T04:18:39+5:302017-05-04T04:18:39+5:30
उन्हाळ्याची सुटी तसेच वाढता उकाडा यामुळे पोहायला जाणे हा मुलांचा आवडता छंद झाला आहे. मात्र हाच छंद जीवघेणा ठरला
ठाणे : उन्हाळ्याची सुटी तसेच वाढता उकाडा यामुळे पोहायला जाणे हा मुलांचा आवडता छंद झाला आहे. मात्र हाच छंद जीवघेणा ठरला आहे. बुधवारी कळवा खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तर मंगळवारी कल्याण खाडीत दोन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.
कळवा, मनीषानगर खाडी येथे बुधवारी १२.३० वा.च्या सुमारास ४ मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यापैकी दीपू हा बाहेरच थांबला होता. मयत कुलदीप विनोद राहोदिया (९) आणि बजिंदर सुरेंद्र सहानी (८) आणि जितू हे तिघे पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागल्याने दीपू याने ही माहिती तेथील नागरिकांना दिली. त्यांनी तातडीने ठाणे पोलीस कंट्रोल रूमला कळवले. कळवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी दाखल झाले. जितूला वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र, कुलदीप आणि बजिंदर या दोघा चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. याचदरम्यान, मुलांना वाचवण्यासाठी गेलेले कर्मचारी रवी पवार यांच्या पायाला काच लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. काचेमुळे त्यांच्या पायाला ४ टाके पडले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणाची कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बुडून मृत्यू होण्याची दुसरी घटना मंगळवारी कल्याण येथे घडली. कल्याण खाडीत आयुष रवींद्र इंगोले (वय २) याचा बुडून मृत्यू झाला. आयुष मंगळवारी दुपारी कल्याण खाडीनजीक खेळत होता. तो खेळताखेळता खाडीत पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. (प्रतिनिधी)