छापे मारताना काळजी घ्या, प्रामाणिकांना त्रास होता कामा नये!
By admin | Published: March 13, 2016 05:12 AM2016-03-13T05:12:40+5:302016-03-13T05:12:40+5:30
आयपीएस अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून एक महिना होऊन गेला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत मुंबई पोलिसांची स्थिती
डिप्पी वांकाणी, मुंबई
आयपीएस अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून एक महिना होऊन गेला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत मुंबई पोलिसांची स्थिती, युवकवर्ग दहशतवादाकडे झुकू नये यासाठी केलेले प्रयत्न आणि अन्य बाबींवर मते व्यक्त केली. या मुलाखतीचा हा सारांश...
मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून आपल्याला एक महिना होऊन गेला. मुंबई पोलीस दलाबद्दल आपला प्राथमिक अभिप्राय काय? आणि तुमच्या समोरील प्राधान्यक्रमांचे प्रश्न काय?
मी सर्वच स्तरावरील अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली आहे. सर्व महत्त्वाच्या विभागीय पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथे काम करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सतत सावध राहावे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असावे, अशी सूचना मी त्यांना केली आहे. पोलीस आणि नागरिक यांचे संबंध सुधारावेत आणि पोलीस-कल्याण हेसुद्धा माझ्यासमोरील महत्त्वाचे विषय आहेत.
जेव्हा तुम्ही पोलीस-कल्याणाची भाषा करता तेव्हा पोलिसांचे नैतिक बळ वाढावे म्हणून काय पुढाकार घेतला?
पोलिसांचे आरोग्य हा आमच्यासमोरील सर्वांत महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे. आम्ही आरोग्य शिबिरे आयोजित करीत आहोत. त्यामुळे विविध विकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल. याशिवाय तणावमुक्तीसाठी आम्ही कार्यशाळा आयोजित करणार आहोत.
जेएनयूमधील विद्यार्थीनेता कन्हैया याला अटक झाल्यापासून मुंबईसह देशभरात विद्यार्थी संघटना निदर्शने करीत आहेत. त्याचा आपण कसा मुकाबला करीत आहात? याबद्दल आपल्याला गुप्तचरांकडून कुठली माहिती मिळत आहे काय?
आम्ही फक्त शैक्षणिक संस्थांच्या बाहेर होत असलेल्या आंदोलनाकडे पाहत आहोत. आम्ही शैक्षणिक संस्थांत प्रवेश करीत नाही. आम्ही या प्रश्नाकडे फक्त कायदा आणि सुव्यवस्था या नजरेतून पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्या हालचालींबाबत आम्ही गुप्तचरांकडून कोणतीही माहिती जमा करीत नाही.
मुंबई हल्लाप्रकरणी डेव्हिड हेडली याने अलीकडेच साक्ष दिली आहे, त्या साक्षीत त्याने त्याला हाताळणारे आणि पाकिस्तानातील अन्य लोकांची माहिती दिली आहे. मात्र, त्याला कसलेच कायदेशीर महत्त्व नाही, असे अनेक लोक जाहीरपणे सांगत आहेत. या पार्श्वूभमीवर हेडलीची साक्ष किती महत्त्वाची आहे?
हेडलीच्या साक्षीला नक्कीच महत्त्व आहे. त्याने ती कोर्टापुढे दिली आहे. अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.
तुम्ही लोकांची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी टिष्ट्वटर सुरू केले आहे. त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण पोलीस भ्रष्ट असल्याचा आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण टिष्ट्वटरवरून मोहीम चालूच ठेवणार काय?
नक्कीच. आमची मोहीम चालू राहील. माझ्या कार्यकाळात असा नकारात्मक प्रतिसाद कमी करणे, याला मी प्राधान्य देणार आहे. त्यासाठी पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मी महत्त्व देणार आहे.
अनेक युवक मूलतत्त्ववाद किंवा दहशतवादाकडे झुकत आहेत. त्यांनी तसे करू नये म्हणून आपण कोणते उपाय योजत आहात?
मुंबई नेहमीच दहशतवादाच्या रडारवर आहे. त्या दृष्टीने दहशतवादविरोधी पथक आणि आमची विशेष शाखा हे दोघेही चांगले काम करीत आहेत. युवकवर्ग दहशतवादाकडे झुकू नये यासाठी संबंधित समुदायाच्या जास्तीत जास्त पुढाऱ्यांनी या युवकांवर प्रभाव टाकावा. यासाठी प्रयत्न करावा, असे मी पोलिसांना सांगितले आहे. या युवकांचा लवकरच आमच्याशी थेट संबंध यावा आणि आमच्यावरील विश्वास वाढावा यासाठी आम्ही लवकरच नवीन उपाययोजना आखणार आहोत. त्याचबरोबर दहशतवाद कसा चूक आहे हे आम्ही त्यांना समजावून सांगणार आहोत.
‘मॉरल पोलिसिंग’वरून मुंबई पोलिसांवर बऱ्याच प्रमाणात टीका झाली आहे, त्याबद्दल तुमचे मत काय? तसेच या मुद्यावर तुम्ही तुमच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना कुठल्या सूचना दिल्या आहेत काय?
‘मॉरल पोलिसिंग’बाबत मी माझ्या सहकाऱ्यांना कडक सूचना केल्या असून कोणाच्याही प्रायव्हसीचा भंग होणार नाही, यादृष्टीने लोकांशी वर्तणूक करण्याचा आदेश दिला आहे. छापे मारताना काळजी घ्या, त्याचबरोबर बेकायदेशीर कारवायांना चाप लावताना प्रामाणिक लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि अन्य सामग्रीचा विचार करता मुंबई पोलिसांना आवश्यक असलेल्या साहित्याचा आपण विचार केला आहे काय, तसेच त्यांच्या सुविधांचा आढावा घेतला आहे काय? मुंबई पोलिसांना एखादी बाब हवी आहे आणि ती त्यांना दिली जात नाही?
याबाबत आम्ही सरकारकडे अनेक प्रस्ताव पाठविले आहेत. त्याबद्दल सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आहे. याक्षणी आम्ही कोणतीही चालढकल करीत नाही.
>मुंबई नेहमीच दहशतवादाच्या
रडारवर आहे. त्यादृष्टीने दहशतवादविरोधी पथक आणि आमची विशेष शाखा हे दोघेही चांगले काम करीत आहेत. युवकवर्ग दहशतवादाकडे झुकू नये यासाठी संबंधित समुदायाच्या जास्तीतजास्त पुढाऱ्यांनी या युवकांवर प्रभाव टाकावा. यासाठी प्रयत्न पोलिसांनी करावा.