सावधान ! तुम्ही आंबे खात आहात...

By Admin | Published: May 5, 2017 10:39 PM2017-05-05T22:39:05+5:302017-05-05T22:39:05+5:30

आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याची माहिती समोर येत आहे.

Be careful! You're eating mangoes ... | सावधान ! तुम्ही आंबे खात आहात...

सावधान ! तुम्ही आंबे खात आहात...

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत /राम शिनगारे
औरंगाबाद, दि. 5 - शहरात गुजरात, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून विविध प्रकारच्या आंब्यांची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. मात्र ही आंबे कच्ची असून, घातक रसायनांचा वापर करुन पिकविण्यात आल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आली. सरकारने बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाईड (कार्पेट) या घातक पावडरचा आंबे पिकविण्यासाठी पाण्यात टाकून वापर करण्यात येत आहे. अशा पद्धतीने पिकवलेली आंबे खाणे शरीरास धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
 
शहरात केशर, हापूस, पायरी अशा विविध प्रकारची परराज्यातून आंबे येत आहेत. ही आंबे शहरातील विविध भागात असलेल्या छोट्या छोट्या गोडाऊनमध्ये उतरविण्यात येतात. त्याठिकाणी लहान मोठ्या आंब्यांची निवड करुन कॅरेटमध्ये  भरण्यात येतात. किरकोळ व्यापा-यांना २५ किलो आंब्याचे कॅरेट ८०० ते १२०० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेरफटका मारला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
पहाटे आंब्याच्या मालाचे ट्रक दाखल होतात. यातील काही ट्रकमधील आंबे उतरण्यापूर्वीच केमिकलाचा वापर करुन पिकविलेले असतात. परंतु ही आंबे न पिकता केवळ त्यांना लाल रंग येतो. यातच जास्त उष्णता निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी ही आंबे उतरण्यात येतात.
 
जेणेकरून ती १२ तासांच्या आत आंबे विक्रीयोग्य होतात. याचवेळी कैºया असलेली आब्यांची आवकही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यात कच्च्या आंब्यावर बंदी असलेले कॅल्शियम कार्बाईड आणि परवानगी असलेले इथिलीनचा मारा प्रमाणाबाहेर करण्यात येत असल्याचे पाहणीत उघड झाले. 
 
शुक्रवारी सकाळी आलेली कच्ची आंबे दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी विक्रीयोग्य होत असल्याची माहिती आंबे व्यापा-यानेच दिली. याशिवाय टरबूज, चिक्कूसह इतर फळांवरही परवागनी असलेले रसायनय फवारण्यात येत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
 
कोणती आहेत रसायने
आंब्यांवर टाकण्यात येणारी कॅल्शियम कार्बाईड (कार्पेट) हे पावडर स्वरुपातील रसायन छिद्र असलेल्या कपड्यामध्ये फळांच्या ढिगा-यात ठेवतात. या पावडरपासून अ‍ॅसिटीलिन नावाचा ताकदवान गॅस तयार होते. तो मानवी शरीराला अपायकारक आआहे. मात्र फळांच्या ढिगा-यात ठेवलेले कार्पेट अन्न व औषधी विभागाच्या अधिका-यांना सहजपणे सापडू शकतो. यासाठी व्यापा-यांनी नवीनच शक्कल लढवत कार्पेट पाण्यामध्ये मिसळून थेट फळांवर फवारणी करण्यास सुरुवात केल्याचे समजते. फळांवर टाकण्यात येणारे दुसरे रसायन हे ‘इथिलीन’ आहे. इथिलीनची १०० पीपीएमची मात्रा वापरण्याची परवानगी आहे. मात्र त्याचा अति मारा फळांवर करण्यात येत असल्याचे विविध पाहणीत समोर आल्याचे अन्नतज्ज्ञ डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.
 
केमिकलच्या फळांमुळे होणार अपाय
केमिकलच्या सहायाने पिकविलेल्या फळांच्या सेवनामुळे ‘स्लो पॉयझेनिंग’ होते. याची तिव्रता कमी प्रमाणात असली तरी दिर्घकालीन आजार उद्भवू शकतात. यात कर्करोग, घशात खवखव, पेप्टीक अल्सर, मळमळणे, अपचन असे अनेक आजार होऊ शकतात. 
खाण्यास अयोग्य आंबे/ फळे
केमिकलचा वापर करुन पिकवलेल्या आंब्यांमध्ये खालील लक्षणे आढळून येतात.
- आंबे किंवा इतर फळांना भडक रंग येणे
- लसणासारखा वास येणे
- फळ दाबून पाहिले तर मऊ न लागणे किंवा फळाचा काही भाग टणक असणे.
- पाण्यात टाकल्यानंतर तरंगणारी फळे ही परिपक्व झालेली नसतात. यामुळे विकत घेतलेले फळ पाण्यात टाकताच योग्य की अयोग्य लक्षात येते.
- तरंगलेले फळ नैसर्गिक पध्दतीने पिकत नाही.
 
योग्य फळे
जैवरासायनिक प्रक्रिया झालेली आंब्यांसह इतर फळे खाण्यास योग्य असतात. यात कच्चे फळ ८ ते १० दहा प्रक्रियेतून जात असते. यात रंग येणे, स्वाद निर्माण होणे, साखरेचे प्रमाण वाढणे, आम्लता कमी होणे, मऊपणा येणे अशी लक्षणे आंबे/फळांमध्ये दिसल्यास ही फळे खाण्यायोग्य असल्याचे अन्नतज्ज्ञ डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.
 
कायद्याच्या कडक अंमलबजावणीची आवश्यकता
बंदी घातलेल्या रसायनाने आंबे, फळे पिकवणे हा अन्न सुरक्षा व मानके या कायद्यानुसार गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळलेल्यांना पाच वर्षांची शिक्षा व लाखो रूपये दंडाची तरतुद आहे. मात्र कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे व्यापारी खुले आमपणे रसायनांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Be careful! You're eating mangoes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.