...तर तुमच्यासोबत असलेली मैत्री तोडू; राज्यातील मित्रपक्षाचा भाजपला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:38 AM2021-08-10T08:38:39+5:302021-08-10T11:53:24+5:30
ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी मैत्रीही तोडण्याचा इशारा जानकर यांनी दिला.
औरंगाबाद : डिमांडर नव्हे तर कमांडर बना. ओबीसींनी स्वत:चे घर बांधावे, किरायाच्या घरात राहू नये, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी येथे दिला. पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा प्रकार चालू असल्याबद्दल जानकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हा सल्ला दिला. शेवटी हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे. पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. पण, अन्याय झाला असे ती अजून मला म्हणालीच नाही. फोन पण नाही केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी मैत्रीही तोडण्याचा इशारा जानकर यांनी दिला.
धनगर आरक्षण अशक्य?
काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसले तरी मी मंत्री असताना धनगर समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी चारशे कोटी मंजूर केले होते. मात्र, राज्य सरकार त्यावर अंमलबजावणी करायला तयार नाही, असेही जानकर यावेळी म्हणाले.