भाषा समृद्धीसाठी कटिबद्ध राहा
By admin | Published: February 28, 2017 02:47 AM2017-02-28T02:47:26+5:302017-02-28T02:47:26+5:30
मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाकरिता प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध असणे आवश्यक आहे.
अलिबाग : मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाकरिता प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध असणे आवश्यक आहे. मराठी भाषेत स्वीकृत झालेल्या अन्य भाषेतील शब्दांचा वापर अट्टाहासाने टाळणे म्हणजे मराठीचे संवर्धन असा चुकीचा समज मात्र करून घेवू नये. ‘एसटी’ हे इंग्रजीमधील संक्षिप्त शब्दरूप आज सर्व स्वीकृत झाले आहे, ते बदलण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन माजी प्राचार्य व साहित्यिक अनंत केशव देवघरकर यांनी केले आहे.
परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून एसटीच्या राज्यातील सर्व आगारांमध्ये तसेच विभागीय कार्यालयांमध्ये वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने अलिबाग एसटी आगारात आयोजित कार्यक्रमात साहित्यिक अनंत केशव देवघरकर बोलत होते.
रायगड जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर म्हणाले, मराठी भाषेचे महत्त्व अल्प वेळात सांगणे कठीण आहे. मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, केवळ देशातच नव्हे तर परदेशातही अभिमानाने बोलली जाते. मराठी भाषा आपली भाषा म्हणून तिचा वापर आपण अधिकाधिक करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारख्या माध्यमांमध्ये देखील मराठी भाषेला प्राधान्य दिल्यास आधुनिक माध्यमातून मराठी समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अलिबाग एसटी आगार व्यवस्थापक गजानन पाटील यांनी मराठी साहित्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास आगारातील अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, अलिबाग एसटी आगार व्यवस्थापक गजानन पाटील आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील ८ एसटी आगार व रामवाडी(पेण)येथील विभागीय कार्यालय अशा सर्व ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती रामवाडी(पेण) विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी दिली.
>आगारात कार्यक्रम
रायगड जिल्ह्यातील ८ एसटी आगार व रामवाडी(पेण)येथील विभागीय कार्यालय अशा सर्व ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती रामवाडी(पेण) विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी दिली
आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना पाटील यांनी
केले.