Nitin Gadkari: राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही; नितीन गडकरींचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:48 PM2022-06-27T14:48:18+5:302022-06-27T14:48:34+5:30
नितीन गडकरी यांनी याआधीदेखील राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याबाबत सुनावणी देखील आता सुरु आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. भाजपा पडद्याआडून बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉर्ट कट' चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. लोकनंतर अशांना दारात उभेदेखील करीत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून रोगरहित लिंबुवर्गीय रोपटे तयार करणे, या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत नितीन गडकरी बोलत होते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता नितीन गडकरींचं हे विधान महत्वाचं असल्याचं दिसून येत आहे.
नितीन गडकरी यांनी याआधीदेखील राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल, असं नितीन गडकरी म्हणाले होते.
दरम्यान, बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर सध्या सुनावणी सुरु आहे.