विरोधी पक्षनेतेच राहा!
By Admin | Published: May 9, 2014 01:24 AM2014-05-09T01:24:46+5:302014-05-09T01:24:46+5:30
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपा नेते विनोद तावडे यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली.
मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपा नेते विनोद तावडे यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. आपण सहा वर्षे या पदावर राहा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तावडे यांना देत पाच महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा एकप्रकारे चिमटा काढला. एक चहावाला पंतप्रधान होऊ घातला आहे, पुढे काय काय होते ते पाहा, असा टोला तावडे यांनी लगावला. तावडे यांच्या फेरनिवडीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली. तावडे यांचे अभिनंदन करताना हास्यविनोद, राजकीय शेरेबाजी तर झालीच, शिवाय लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांवरून एकमेकांना सुनावण्याची संधी दोन्ही बाजूंनी सोडली नाही. महाविद्यालयीन जीवनापासून सक्रिय असलेले तावडे अभ्यासू नेते आहेत. सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अपार मेहनत हा त्यांचा गुणविशेष आहे, असे कौतुक सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तावडे सभागृहात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. सभागृहाचे नेते अजित पवार यांनी मात्र माणसे जोडण्याचे कसब असलेले तावडे उत्तम वक्ते असून, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांना बरोबर जमते, असे सांगितले. दुष्काळग्रस्त भागात त्यांनी मोटरसायकलवरून दौरा केला. मोटरसायकलवरून जातानाच ते चॅनलवाल्यांना मुलाखती देत होते. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या दोन्ही नेत्यांना ते जवळचे वाटतात, अशी फिरकी घेतली. १६ मे नंतर राजकीय समीकरणे तशीच राहतील, याचा अंदाज आल्यानेच तावडेंनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले, असेही ते म्हणाले. आपले पद किती काळासाठी आहे ते पुढे ठरेल, पण मिळालेल्या पदाचा वापर आपण सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करू, असे तावडे म्हणाले. सांसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांनीही भावना व्यक्त केल्या. सभागृहाचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिवाजीराव देशमुख, विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर, हेमंत टकले, किरण पावसकर, चंद्रकांत रघुवंशी, नीलम गोºहे, हरिभाऊ राठोड आणि आनंद ठाकूर या नव्या सदस्यांचा परिचय करून दिला. (विशेष प्रतिनिधी)